Ahmednagar News : गेल्यावर्षी बचत गटातील अवघ्या ५० महिलांना मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या माध्यमातून उद्योजक होत आले. मग उर्वरित महिला का नाही? असा विचार करून जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील महिला बचत गटातील २ हजार ८०० महिलांना उद्योजक होण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांना आपला उद्योग मोठा करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतून कर्ज उपलब्ध करू देण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पुढाकार घेतला असून या २ हजार ८०० महिलांमधून १५० एकल महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
त्यासाठी व्यापक मोहिम सुरू केली असून आत्तापर्यंत ९१२ महिलांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत वैयक्तीक लाभाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवला जातो.
त्याअंतर्गत १ ते ५० लाखापर्यंत कर्ज बँकांमार्फत उपलब्ध केले केले जाते. राज्य सरकार १५ ते ३५ टक्क्यांपर्यत त्यावर सवलत देते. यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘उमेद’ कार्यक्रमात महिला बचत गटांना उद्योग उभारणीसाठी कर्ज वितरण केले जाते. या बचत गटातील एक महिला सदस्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात प्राधन्य देऊन त्यांना उद्योजक करण्याचा प्रयत्न आहे.
प्रत्येक तालुक्यातील किमान १० एकल महिलांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा देण्याचा प्रयत्न आहे.
बचत गटांना ३४९ कोटींचे कर्जवाटप
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘उमेद’ कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांपैकी २८ हजार ३०० बचत गट जिल्ह्यात कार्यरत आहेत. यातील ११ हजार ३९ गटांना गेल्या वर्षी ३४९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यंदा आणखी ९ हजार बचत गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट नगर जिल्ह्याला देण्यात आले आहे.