Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘बड्या’ मल्टीस्टेटकडून पतसंस्थेच्या लाखोंच्या ठेवी गायब पैसे मागताच जीवे मारण्याच्या धमक्या, संचालकांसह १८ जणांवर गुन्हा

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याने सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पतसंस्था अगदीच धोक्यात आलेल्या दिसतात. मध्यंतरी काही घोटाळे उघड झाले असतानाच आता एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

अहमदनगरमधील महालक्ष्मी मल्टिस्टेट पतसंस्थेने त्यांच्याकडे ठेवलेल्या ठेवी परत न करता ज्ञानेश्वर पतसंस्थेची ४९ लाख ५४ हजार ९६१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सावेडी येथील श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, शाखाधिकारी अशा १८ जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर पतसंस्थेचे संचालक व सचिव धोंडीराम शंकर राऊळ यांनी फिर्याद दिली. श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा हेमा सुरेश सुपेकर, उपाध्यक्ष अशोक गंगाधर गायकवाड, संचालक राहुल अरुण दामले,

मनीष दत्तात्रय कुटे, राजेंद्र सुखलाल पारख, अजय चंद्रकांत आकडे, मधुकर मारुतीराव मुळे, प्राजक्ता प्रकाश बोरुडे, नवनाथ भिकाजी शेटे, विजय बन्सीलाल मुनोत, संजय चंद्रकांत खोडे, चंद्रकांत सूरजमल आनेचा, प्रकाश बाबुलाल बच्छावत, मच्छिंद्र भिकाजी खाडे, शामराव हरी कुलकर्णी, सुनील रंगनाथ वाघमारे व शाखाधिकारी शैलेंद्र ज्ञानेश्वर सुपेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

‘महालक्ष्मी’मध्ये ठेव म्हणून ठेवल्या ‘ज्ञानेश्वर’च्या ठेवी ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अशोक गायकवाड हे महालक्ष्मी मल्टिस्टेटचे संचालक व उपाध्यक्ष आहेत. गायकवाड व मल्टिस्टेटच्या इतर संचालकांनी ज्ञानेश्वरमध्ये जमा असलेल्या ठेवीच्या रकमा महालक्ष्मी मल्टिस्टेटमध्ये ठेव म्हणून ठेवल्या.

याबाबत ज्ञानेश्वरच्या काही संचालकांनी त्यास हरकत घेतली असता अशोक गायकवाड यांनी त्यांच्या अधिकाराचा दुरूपयोग करून २ ऑगस्ट २०१६ रोजी २० लाख ३२ हजार ८७५ रुपये व १० सप्टेंबर २०१६ रोजी २९ लाख २१ हजार ४८६ रुपये असे ४९ लाख ५४ हजार ९६१ रुपये कायम ठेवी ठेवण्यास भाग पाडले, असा तक्रारीत आरोप केला आहे.

ठेवी परत मागितल्याने जीवे मारण्याची धमकी
ठेवीची मुदत संपल्यानंतर फिर्यादी राऊळ यांनी संस्थेच्या वतीने श्री महालक्ष्मी मल्टिस्टेटकडे ठेवींच्या रकमेची मागणी केली असता संचालकांनी रक्कम परत दिली नाही. रक्कम देण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून मुदती मागितल्या. वेळोवेळी पत्रव्यवहार केला असता अद्याप रक्कम मिळाली नाही.

रकमेची मागणी करतात म्हणून अशोक गायकवाड व इतरांनी ५ मे २०२२ रोजी फिर्यादी राऊळ यांच्या ओळखीचे व्यक्ती, संचालक व साक्षीदार यांना जीवे मारण्याच्या व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe