Ahmednagar News : तब्बल ७६ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल परी जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून धावत आहे. लाखो जणांच्या शिक्षणासाठी तिने हातभार दिला आहे. कोरोनामुळे या महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली होती. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून प्रवाशी संख्या वाढल्याने एसटी परत सुसाट धावत आहे.
बदलत्या काळात खासगी प्रवाशी वाहतुकीचा फटका देखील एसटी महामंडळाला बसत आहे. खासगी प्रवाशी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी महामंडळाने शिवनेरी, शिवशाही, निमआराम, तसेच शिवाई आदी आधुनिक बससेवा सुरु केली आहे. त्यामुळे आर्थिकस्थिती चांगली असलेले नागरिक बसकडे वळू लागले आहेत.
येत्या दोन तीन महिन्यांत जवळपास शंभर शिवाई बस जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नगरकरांचा प्रवास आणखी सुखद होणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असलेल्या प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी देखील एसटीची सेवा उपलब्ध आहे.त्यामुळे लाल परीचा राज्यातच नव्हे तर परराज्यात देखील डंका वाजत आहे.
दि. १ जून १९४८ रोजी एसटी महामंडळाची पहिली बस पुणे- अहमदनगर मार्गावर धावली. सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाची बस करीत आहेत. ७६ वर्षांपासून ते आजही ऊनवारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडीअडचणी, अडथळे, आर्थिक संकटावर मात करीत डोंगरदऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यापर्यंत एसटी आपली प्रवाससेवा देत आहे.
२०२० मध्ये एसटी महामंडळाच्या ७५० बस धावत होत्या. मात्र, कोरोनामुळे बससेवा बंद ठेवावी लागली. दोन ते तीन महिने बससेवा ठप्प असल्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक खाईत लोटले होते. महामंडळाच्या अहमदनगर विभागाला दररोज सरासरी ६० ते ६५ लाख रुपयांचा फटका बसला होता. बससेवा ठप्प असल्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी शंभरएक बसचे रुपांत्तर मालवाहतूक गाड्यांमध्ये करावे लागले. त्यानंतर बससेवा पुन्हा सुरु झाली. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी बसला जनतेकडून प्रतिसाद मिळत नव्हता.
त्यामुळे दररोज सरासरी २० ते २५ लाख रुपयांचा आर्थिक फटका महामंडळाला बसत होता. गेल्या दीड वर्षांपासून बससेवा सुरळीत सुरु आहे. आजमितीस विभागात सहाशेंच्या आसपास बस धावत आहेत. बसची संख्या कमी झाली असली शासनाच्या आदेशानुसार महामंडळाने ७५ वयापेक्षा अधिक वयोवृध्द व्यक्तींसाठीअमृत योजना सुरु आहे.
महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांना ५० टक्के सवलत दिली गेली. त्यामुळे प्रवाशी संख्या वाढण्यास मदत झाली. एकंदरीत बसची संख्या कमी झाली असली तरी प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे आजमितीस ६०० ते ६१५ बस दररोज प्रवाशी घेऊन दैनंदिन २ लाख २० हजार किलोमीटर धावत आहेत. त्यातून महामंडळाला दररोज सरासरी ६० ते ६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे.