Ahmednagar News : राज्य परिवहन महामंडळातील अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी आता कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच संदर्भात येत्या ९ ऑगस्ट अर्थात क्रांतीदिनापासून महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचारी संघटनांनी बेमुदत धरणे आंदोलनाची हाक दिली आहे.
जिल्ह्यातील एसटी कामगार या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती विविध कामगार संघटनांच्या अहमदनगर विभागीय पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनात एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, एसटी कर्मचारी काँग्रेस,
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक, मोटार कामगार फेडरेशन, एसटी कामगार काँग्रेस, राज्य परिवहन यांत्रिकी कामगार संघटना, परिवहन मजदूर युनियन, रिपब्लिकन एसटी कर्मचारी संघटना, नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी
संघटना आणि राष्ट्रीय कर्मचारी सेना यासह मोठ्या प्रमाणात एसटीचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. नगर विभागातील एसटीचे कर्मचारी न्याय हक्काच्या या निर्णायक लढ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष शशिकांत वाघचौरे, सरचिटणीस काशिनाथ सुलाखे पाटील,
कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष रोहिदास अडसूळ, सचिव दिलीप लबडे, कामगार सेनेचे अध्यक्ष गणेश फाटक, सचिव नितीन येणे, एसटी कामगार काँग्रेस इंटकचे विभागीय अध्यक्ष सुरेश चौधरी, सचिव दिनकर लिपाने यांनी दिली. प्रवाशांच्या सेवेचे ब्रीदवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाची लालपरी अर्थात एसटी मागील ७५ वर्षांपासून निरंतर धावत आहे.
महानगरापासून थेट गाव-खेड्यापर्यंत या साडेसात दशकांच्या काळात एसटीच्या प्रवासी सेवेचा विस्तार झाला. राज्याच्या प्रगतीत एसटीने दिलेले योगदान सर्व मान्य राहिले आहे. आजमितीस राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेच्या ताफ्यात राज्यात जवळपास एक लाखाच्या घरात चालक, वाहक, तंत्रज्ञ, अधिकारी असे मनुष्यबळ आहे.
नगर विभागाचा विचार केला असता आजमितीस नगर विभागातील ११ आगारात अधिकारी, तंत्रज्ञ, चालक, वाहक असे जवळपास साडेचार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळेच प्रवासी सेवेत एसटीचे नाव विश्वासाहार्य ठरले. मात्र, प्रवाशांच्या सेवेचे पाईक असूनही उपेक्षित असल्याची भावना मागील वीस वर्षापासून एसटी कामगारात वाढत गेली.
वेतन वाढीतील अवमेळ दिरंगाईमुळे यास कारानुभूत ठरली. याची तड लावण्यासाठी एसटी कामगारांनी अर्ज, विनंती निवेदने, धरणे आंदोलने केली गेली. न भूतो न भविष्यती असा संप देखील करण्यात आला. आता पुन्हा एकदा एसटी महामंडळात कार्यरत विविध कामगार संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आंदोलनाची हाक दिली आहे.
याबाबत २७ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांना रीतसर सुचित करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या प्रलंबित आर्थिक व इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने कामगारात नाराजी झाल्याचे नमूद करीत राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांतीदिनापासून राज्यातील एसटी कर्मचारी राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.