Ahmednagar News : भाजपच्या दक्षिणेतील वर्षानुवर्षांच्या सत्तेला लंके यांनी लावला सुरुंग

Pragati
Published:

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी बाजी मारली तर महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, लंके यांनी २८ हजार ९२९ मतांच्या फरकाने सुजय विखे यांचा पराभव केला. लंके यांचा विजय घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण जल्लोष साजरा केला.

नगरच्या एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मंगळवारी (दि.४) सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या १० फेऱ्यात खा. विखे यांनी १० हजाराची आघाडी घेत विखेंनी सुरुवातीलाच बाजी मारली. मात्र लंके यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेत विजय संपादन केला. लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ इतकी तर विखे यांना ५ लाख ९५ हजार ८६८ इतकी मते पडली.

विखे हे मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून होते. मात्र दुपारनंतर मतदानफेरीचा अंदाज आल्यानंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला. तर लंके हे दुपारनंतर मतमोजणी केंद्रावर हजर झाले. त्यांचे आगमन होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला. सकाळी सुरु झालेली मतमोजणी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संपुष्टात आली. नगर दक्षिणेप्रमाणेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचीही मतमोजणी वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये होती.

नगर दक्षिणेतून महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी तर शिर्डीतून महाविकास आघाडीचेच भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारत महायुतीच्या विद्यमान खासदारांना पराभवाची धूळ चारली. विशेष म्हणजे नगर दक्षिणेत सुमारे २५ वर्षे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व होते.

या ठिकाणी सतत कमळ फुलले. स्व. दिलीप गांधी यांनी सलग तिसऱ्यांदा विजयाचा हॅटट्रिक केली होती. मागील वेळी खा. विखे यांनी २ लाख ८२ हजार मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला होता. यावेळी मात्र खा. विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच लोखंडे यांचाही मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. मंगळवारी (दि.४) दिवसभर कोण आघाडीवर अन कोण पिछाडीवर ? याचीच जोरदार चर्चा होती.

त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था होती. मात्र सायंकाळी चित्र स्पष्ट झाल्याने अफवांना पूर्णविराम मिळाला. लंके यांचा विजय घोषित झाल्यानंतर नगर शहरासह दक्षिणेतही लंकेंच्या विजयाबद्दल जल्लोष करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News