Ahmednagar News : विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील चारही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याची चिन्हे दिसत असली तरी महाविकास आघाडीत अद्याप एकी दिसत आहे.
भाजपने सोमवारी सकाळी आपले तीन उमेदवार जाहीर केले. कोकण पदवीधरमधून विद्यमान आमदार निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरमधून किरण शेलार, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांची उमेदवारी भाजपचे केंद्रीय महासचिव अरुण सिंह यांनी जाहीर केली. दरम्यान, लोकसभा निवडणूक एकत्र लढवणाऱ्या महायुतीतील तिन्ही घटक पक्षांत या निवडणुकीत मात्र फूट पडल्याचे दिसत असून, या निवडणुकीत मनसेसह हे चार पक्ष एकमेकांच्या समोरासमोर आल्याचे दिसत आहे.
तर शिवसेना ठाकरे गटाने मुंबई पदवीधरमधून अनिल परब, मुंबई शिक्षकमधून ज. मो. अभ्यंकर व नाशिक शिक्षकमधून संदीप गुळवे आदी आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, कोकण पदवीधरमधून काँग्रेसचे रमेश कीर यांनी सोमवारी आपला अर्ज दाखल केला. कोकण पदवीधरमध्ये ठाकरे गट काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. नाशिकचे काँग्रेसचे उमेदवार संदीप गुळवेंना ठाकरे गटात प्रवेश देऊन उमेदवारी दिल्याने काहीशी नाराजी आहे.
ती नाराजी दूर करण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणातील काँग्रेस जन सोबत ठेवण्यासाठी ठाकरे गट कोकण पदवीधरला उमेदवार न देता काँग्रेसच्या कीर यांना पाठिंबा देईल, अशी माहिती आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाने आम्ही कोणताही उमेदवार देणार नसून, मित्रपक्षांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीत बिघाडी तर आघाडीत एकी, असे आता तरी चित्र आहे.
विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ जून आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत उमेदवारांची अर्ज भरण्याची लगबग राहणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपचा दबदबा असतानाही मनसे आणि अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घटक पक्षांनी उमेदवार जाहीर केले असताना भाजपने सोमवारी सकाळी नवी दिल्लीतून महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची नावे घोषित केली. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत म्हणजे १३ जूनपर्यंत महायुतीत विधान परिषद निवडणुकीबाबत तोडगा निघाला नाही तर महायुतीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढताना दिसण्याची शक्यता आहे .