Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात बिबट्याचा हौदोस ही गोष्ट नित्याचीच झाली असून नागरिकांत दहशत पाहायला मिळत आहे. आता आणखी हिंस्त्र घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. बिबट्याने शेतकऱ्याच्या दारात अगदी हौऊस घातलेला पाहायला मिळाला.
संगमनेर तालुक्यातील गणपीरदरा (आंबी खालसा) येथे ही घटना घडली. या हल्ल्यात सहा बोकड व चार शेळ्या ठार झाल्या आहेत. गणपीरदरा येथील शेतकरी रईस अंबीर शेख यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.३) मध्यरात्री घडली.
यात शेतकऱ्याचे सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. रईस शेख हे आपल्या कुटुंबासोबत गणपीरदरा येथे राहत असून शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात. त्यांनी शेळ्यांसाठी कौलारु गोठा बनवून बाजूने कुंपणासाठी जाळीचा वापर केला आहे.
नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी शेख यांनी शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने जाळीवरून उडी मारत गोठ्यात प्रवेश केला, गोठ्यातील ३० शेळ्यांपैकी सहा बोकड, चार शेळ्या बिबट्याने ठार केल्या. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शासकीय नियमानुसार संबंधित शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
पठार भागात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात बिबट्याचा हौदोस ही गोष्ट नित्याचीच झाली असून नागरिकांत दहशत पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणच्या झालेल्या हिंस्त्र घटना पाहता वनविभागासह शेतकऱ्यांनीही काही गोष्टींची उपाययायोजना करणे गरजेचेच आहे. परंतु तसे काही गोष्टी होताना दिसत नाहीत. अनेक भागात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्यांचे बळी गेल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.