Ahmednagar News : सोमवारी रात्री व पहाटे राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वळण, आरडगावमध्ये रानच्या वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले चढवत वळणमध्ये दोन मोठ्या शेळ्या ठार केल्या आणि एकीला जखमी अवस्थेत सोडून पळ काढला.
तर आरडगावमध्ये एका सात महिन्याच्या कालवडीला ठार केले. गेल्या पंधरा दिवसात या भागातील विविध शेतकऱ्यांच्या सुमारे सहा ते सात शेळ्या, दोन पाळीव कुत्रे आणि दोन कालवडींचा बळी बिबट्यांनी घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली आहे.
सोमवारी रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान खळणा मानोरी रस्त्यालगत असलेल्या वळण येथील डमाळे वस्तीवरील कृष्णा मच्छिद्र डमाळे यांच्या घरासमोरील कुडामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने हल्ला चढवत दोन मोठ्या शेळ्यांना ठार केले.
यातील एक उसाच्या शेतात नेऊन फस्त केली, तर दुसरी जागेवर मारली. तिसरीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु शेळ्याच्या ओरडण्याच्या आवाजाने कौसाबाई डमाळे, कृष्णा डमाळे हे जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने जखमी शेळीला जागेवरच सोडून देत उसाच्या शेतात धूम ठोकली.
बिबट्याच्या अशा हल्ल्यांमुळे या गरीब डमाळे कुटुंबीयांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. सोमवारी सकाळी वनरक्षक आर. सी. आडगळे व वन कर्मचारी एम. एस. शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस पाटील सोमनाथ डमाळे, मच्छिद्र डमाळे, रोहिदास आढाव आदींनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.
दुसऱ्या घटनेत सोमवारी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान आरडगाव म्हसे वस्ती रोडलगत असलेल्या चंद्रशेखर मच्छिद्र गुडघे यांच्या घरासमोर असलेल्या गायीच्या गोठ्यात गिन्नी गवतातून आलेल्या बिबट्याने हल्ला चढवत सुमारे सात महिन्याच्या कालवडीला पंजा मारल्याने ते वासरू मेले. गायींच्या ओरडण्याने चंद्रशेखर गुडधे, मच्छिद्र माधव गुडधे जागे झाले.
त्यांनी आरडाओरडा केल्याने कालवडीला जागेवर टाकत बिबट्याने पळ काढला. येथेही सोमवारी दुपारी वनविभागाच्या या कर्मचाऱ्यांनी नियत क्षेत्र अधिकारी पाचरणे व वनपाल राजू रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आडगळे व शेळके यांनी पंचनामा केला. वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी चंदू गुडघे, राहुल देशमुख, निलेश झुगे, वैभव झुगे, रवी झुगे, राजेंद्र म्हसे,
तेजस झुगे, मारुती झुगे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. राहुरीच्या पूर्व भागातील विविध गावांमध्ये सातत्याने बिबट्यांचे दर्शन शेतकऱ्यांना शेतमजुरांना होत आहे. अनेकांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत शेळ्या, कुत्रे, कालवडींना ठार मारले जात आहे. हे बिबटे पाळीव प्राण्यावर हल्ला करीत असले तरी शेतात काम करणाऱ्या महिला, शेतमजूर व शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती असून भविष्यात माणसांवर हल्ला होऊ नये अशी भीती व्यक्त केली जात आहे.