दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस होऊन नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार लहू कानडे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील श्रीरामपूर तालुक्यातील सर्व मंडळामध्ये तसेच राहुरी तालुक्यातील मंडळांमध्ये मागील दोन दिवस अवकाळी पाऊस झाला.
या पावसाने शेतातील कपाशी, कांदा रोपे, मका, ऊस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाळ्यात ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडला. त्यामुळे पावसाभावी पिके जळून गेली.
यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आणि आता तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यानुसार पंचनामे करून तसा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविणे आवश्यक असून याबाबत सर्व संबंधितांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे आ. कानडे यांनी श्रीरामपूर व राहुरी तहसीलदार यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शासनाने मदत जाहीर केली. त्याचे अनुदान प्राप्त झाले असले, तरी श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावे या अनुदानापासून वंचित आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी पिक विम्याची नोंद केली आहे.
पावसाने खंड दिल्याने शासनाने पिक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम मंजूर केली. ही रक्कमही तालुक्यातील अनेक गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. याबाबतही पाठपुरावा करून शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान व पिक विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी, असेही आ. कानडे यांनी म्हटल आहे.