Ahmednagar News : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावच्या परिसरातील एका घटनेवरून कथित जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात सकल हिंदू समाज, हिंदू संघटना व आंबीखालसा गावकरी शुक्रवारी (१२ जुलै) परिसरात कडकडीत बंद पाळून घारगावात एकवटले.
आंबी खालसा परिसरातील हिंदू समाजाच्या १९ वर्षीय तरुणीला बळजबरी पळवून नेत तिचा ब्रेन वॉश केला. तिचे धर्मांतर करून घेत विवाह केला. तिचे नामकरण करत जन्नत नाव ठेवले गेल्याचा आरोप सकल हिंदू, हिंदूत्त्ववादी संघटना व ग्रामस्थांनी केला.
या विरोधात ग्रामस्थांसह हिंदुत्त्ववादी संघटनांनी परिसरातील गावांत बंदची हाक दिली आहे. त्यापूर्वी जनआक्रोश मोर्चा काढून रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
हजारोंच्या उपस्थितीत आंबी खालसा गावातील शनेश्वर मंदिराजवळ हिंदू समाज एकत्र होत पायी मूक मोर्चा काढला. घारगाव बस स्थानक परिसरात जाहीर सभा झाली. शुक्रवारी परिसरातीला सर्व व्यवहार बंद ठेवले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात केला होता. बस स्थानकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले.
एका समाजाच्या तरुणाने काही लोकांच्या मदतीने रविवारी (दि. ७) घारगाव बसस्थानक परिसरातून तरुणीला पळवून नेले. या घटनेची घारगाव पोलिस स्टेशनमध्ये केवळ हरवल्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकाराने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. तिचे अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकाराने परिसरात हिंदू समाजात प्रचंड चीड निर्माण झाली असून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात होता. हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच घारगाव पोलिसांनी तत्काळ सबंधित तरूण, तरुणीचा शोध घेतला. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.
त्या दोघांनी प्रेम विवाह केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना घारगाव पोलिसांनी बंदोबस्तात सुरक्षित ठिकाणी पोहचविल्याची माहिती समोर येत आहे. ती या तरुणास सोडण्यास तयार नाही. तिच्याकडे चौकशी करताना तिला त्रास होऊ
लागल्याने घारगाव पोलिसांच्या संरक्षणात उपचारासाठी खासगी रुग्णवाहिकेतून प्रथम पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील हॉस्पिटलमध्ये व नंतर मंचर येथे हलविले आहे. तरुणास घारगाव पोलिसांनी संरक्षणात ठेवले आहे. यादरम्यान तरुणीला पुन्हा मध्यरात्री घारगाव पोलिस स्टेशनला आणले.
पहाटेच पोलिस बंदोबस्तात सदर तरुणी व दुसऱ्या समाजाच्या तरुणाला सुरक्षित ठिकाणी हलविल्याची माहिती समोर आली आहे.