Ahmednagar News : मान्सूनचा प्रवास थांबला असून, मान्सूनच्या वाटचालीमध्ये रविवारी काहीच प्रगती झालेली नाही.पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या उर्वरित भागात पोहोचण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा कायम आहे.
काही भागांत यलो अलर्ट आहे. दरम्यान, रविवारी पावसासह ऊन-सावलीचा खेळ राज्यात पाहायला मिळाला, तसेच पावसाचा जोर कमी होता. विदर्भामध्ये पावसाची प्रतीक्षा असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी मात्र पाऊस होत आहे. त्याचाही जोर कमी झाला असून, काही भागांत मात्र वादळवाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
रायगडला १९ ते २० जून रोजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी १८ ते २० जून रोजी यलो अलर्ट दिला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही यलो अलर्ट आहे. मान्सून संपूर्ण कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत तसेच विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूरपर्यंतच्या भागापर्यंत पोहोचला आहे.
गेले तीन दिवस मान्सूनची चाल मंदावली आहे. खान्देश, पूर्व विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. मान्सूनची उत्तरी सीमा कायमअसून, एक उत्तर-दक्षिण द्रोणिका ईशान्य अरबी समुद्र व लगतच्या सौराष्ट्रवरील चक्रीय स्थितीपासून ते पूर्व मध्य अरबी समुद्र-महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत स्थित आहे.
तसेच, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत, पश्चिम बंगाल व बिहारच्या काही भागांत आणि उप-हिमालय पश्चिम बंगालच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भातील तुरळक भागांत पाऊस पडला.
पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला. रविवारी विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश तापमानाची नोंद झाली. येत्या १७ ते २० जून दम्यान, कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेफार्जनेसह मुसळधार तसेच विदर्भात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.