Ahmednagar News : बैलपोळा.. हा सण म्हणजे शेतकऱ्यांचा. बळीराजा व बळीराजाचा सोबती बैलांचा हा सण. देशाचं पोट भरवणारा बळीराजा बैलपोळ्यासाठी सज्ज झालाय. त्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झालाय.
त्यात आता बैलांची संख्या कमी झाली आहे. ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांची संख्या वाढलीये. आता हे शेतकरी देखील बैलांसोबत ट्रॅक्टर सजवून आणतात.
नगर तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये श्रावणी बैलपोळा, तर काही गावांत भाद्रपदी बैलपोळा असा दोन वेळेस बैलपोळा सण साजरा केला जातो. यंदाच्या पोळ्यासाठी तालुक्यातील बाजारपेठा सजल्या आहेत.
बैलांच्या सजावटीसाठी साहित्य खरेदीसाठी दुकांनामध्ये शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. घोगरमाळ, सुताचे कासरे, शिंदोरी, शिंगात घालण्यासाठी शेंब्या, पितळे तोडे, गोंडे, हिंगूळ, कवडीमाळ, घुंगरू, मोहरकी, घाटी, गोंडे, संत्रामाळ, सरजोडी, डमरू आदींसह बैल रंगविण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगांची
दुकाने बाजारपेठेत थाटली आहेत. यंदा खरीप हंगाम जोरात असून, जनावरांना हिरवा चाराही मुबलक उपलब्ध आहे. यंदा पोळ्याचा सण जल्लोषात साजरा करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
महागाईचा चटका
यावर्षी बैल सजावटींच्या साहित्यांचे भाव वीस टक्क्यांनी वाढले आहेत. रंगरंगोटी करण्याबरोबरच सधन शेतकरी महागड्या झुली खरेदी करीत. सध्या झुलींची किंमत पंधराशे ते तीन हजार रुपयांपर्यत आहेत.
त्यामुळे महागड्या झुली आता बाजारातून गायब झाल्या आहेत. दरम्यान, यंदा खरीप हंगाम जोरात असून, जनावरांना हिरवा चाराही मुबलक उपलब्ध आहे. यंदा पोळ्याचा सण जल्लोषात साजरा करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.