Ahmednagar News : एकीकडे उष्णतेचा कहर वाढत आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर गेले आहे. दिवसा प्रचंड तापमान व रात्री ढगाळ हवामान असे विषम वातावरणास सध्या तोंड द्यावे लागत आहे. या विषम हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यसमस्या वाढीस लागल्या आहेत.
उन्हामुळे ताप, थकवा, बाहेरचे खाण्यात आल्याने उलट्या, जुलाब आदी आजारांचे प्रमाण सध्या वाढल्याचे दिसते. मागील काही दिवसात हेच रुग्ण सध्या अनेक ओपडींमध्ये दिसत आहेत. मागील हप्त्यापासून अहमदनगर जिल्ह्याचा पारा ३९ ते ४१ अंशावर असून उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवत आहे.
वाढती उष्णता आणि बदलते हवामान यामुळे सध्या वेगवेगळे आजार पाहायला मिळत आहेत. कमी भूक लागणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, ताप, उच्च रक्तदाब असे आजार पाहायला मिळत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे अनेकांना चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, अशक्तपणाच्या समस्या जाणवत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
व्हायरल तापाचे प्रमाण वाढले, सोबत जंतुसंसर्गही
जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहेत. त्यापूर्वी नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. सध्या दिवसाचे तापमान ४१ अंश आहे. ढगाळ हवामानामुळे रात्री उकाड्यात भर पडते. अशा संमिश्र हवामानामुळे व्हायरल तापाचे प्रमाणही वाढले आहे.
दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात फिरू नका असा सल्ला डॉक्टर देतायेत. थंडी-तापाचे रुग्ण आढळत आहेत. आधीच उष्णता त्यात रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकांना जुलाब, उलट्या, तसेच पोटात जंतुसंसर्ग झालेले रुग्ण दवाखान्यात येत आहेत.
उन्हाच्या कडाक्यामुळे अंगदुखी, डोकेदुखी, तापाच्या रुग्णही आहेत. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने थकवाही येतो. असे आजार असले तरी सध्या कोणत्याही प्रकारची साथ नाही असे डॉक्टर म्हणतात.
उन्हामध्ये कशी घ्याल स्वतःची काळजी
उन्हामध्ये जाणे व उन्हात अतिश्रमाची कामे करणे टाळावे, वारंवार पाणी पीत रहा, फळांचा आहारात समावेश करा. सुती कपडे, गॉगल्स, छत्री किंवा टोपी वापरा. अल्कोहोल, चहा- कॉफी, कार्बोनेटेड ड्रिक्स टाळा.
उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी व शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ओआरएस, लस्सी, तांदळाचं पाणी, लिंबू सरबत आदी लिक्विड पेय प्या. घर थंड ठेवण्यासाठी पडदे लावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा. थंड पाण्याने आंघोळ करा. या उपायांमुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल.