अहमदनगर बातम्या

जामिनावर असणाऱ्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अहमदनगरमधील घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा आलेख वाढतच चालला आहे की काय असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. श्रीरामपुरातील काही अत्याचाराच्या घटना ताजा असतानाच आता जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची व त्यातून ती गर्भवती राहून मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना संगमनेरमधून समोर आली आहे.

अल्पवयीन मातेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे यांने गेल्या वर्षी एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. तिच्याशी ठेवलेल्या शरीर संबंधातून ती गर्भवती राहिली. प्रसूतीसाठी तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर अल्पवयीन मातेने या संदर्भात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर बोडखे (वय ३६ रा. तळेगाव दिघे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता अटक केली असून त्याला तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते यांनी संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर उभे केले असता जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपीस २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, शेतमजुरीचे काम करणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल आहे. त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मात्र पुन्हा दुसऱ्या प्रकरणात आरोपी अडकला असून, त्याचा जामीन रद्द केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Ahmednagarlive24 Office