Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत काँग्रेसला नवसंजीवनी देणारे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुक लागल्यापासून राज्याचे लक्ष अहमदनगर जिल्ह्याकडे लागले होते. कारण या मतदारसंघात उमेदवारांपेक्षा दोन ज्येष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. महाविकास आघाडीच्या या दोन्ही जागा निवडणूक आणण्याची जबाबदारी आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर टाकण्यात आली होती. आ. थोरातांनी शिर्डीवर लक्ष केंद्रित करत असताना दक्षिण नगरमध्ये महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी आपली विशेष यंत्रणा सक्रिय केली.
निवडणूक प्रचार, नियोजन ते प्रत्यक्ष सभा, कार्यकर्त्यांशी संवाद, नाराज घटकांची मोटबांधणी यासह विजयासाठी जे जे आवश्यक होते त्यात थोरातांनी लक्ष घातले. इकडे शिर्डी मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते सोबत मोठी जबाबदारी डॉ. जयश्री थोरात पहात असल्याने आ. थोरात हे जिल्ह्या बरोबरच राज्यात प्रचार करत करत होते. आ. बाळासाहेब थोरात यांनी उत्तरेची यंत्रणा दक्षिणेत पाठवून एकप्रकारे लंके यांचा विजय खेचून आणला, असे म्हणावे लागेल.
तर उत्तरेची जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकली होती. माजी आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात व काँग्रेस कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन वाकचौरे यांना संगमनेर व अकोले तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यात यश मिळविले. लोकसभा निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी पार पाडताना मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली. गेली दोन महिने राज्यभर गावोगावी फिरून काँग्रेससह आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करून मोठे यश मिळाले.
दगदग व थकव्यामुळे निवडणूक काळात पुरेशी विश्रांती न मिळाल्याने आ. थोरातांची प्रकृती बिघडली होती. यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आ. थोरात यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आ. थोरातांच्या तब्येतीची चौकशी केली. ‘लवकरात लवकर बरे व्हा व तब्बेतची काळजी घ्या. आराम करा’ असा सल्ला त्यांनी थोरात यांना दिला. थोरात यांची प्रकृती आता उत्तम असून रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर थेट संगमनेरला परतणार आहेत. कार्यकर्त्यांनी मुंबईला भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन थोरात यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.