अहमदनगर बातम्या

मोगऱ्याच्या किमतीची रेकॉर्डकडे वाटचाल, गजरेही होतायेत दुर्मीळ !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : लग्नसराई व इतर कारणांसाठी फुलांची मागणी वाढतेय. त्यामुळे फुलांचे भाव चढलेले आहेत. यामध्ये सध्या मोगरा भाव खातोय. त्यामुळे मोगऱ्याचे गजरेही घेणे लोक टाळतायेत. सध्या मार्केटमध्ये मोगऱ्याच्या फुलास ८५ हजारांचा प्रतिक्विंटलला भाव मिळत आहे.

काही दिवसात हे भाव आणखीन वाढतील असे चित्र सध्या असल्याचे व्यापारी म्हणत आहेत. अहमदनगर शहरातील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मोगऱ्याच्या फुलांची आवक कमी असल्याने फुलांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे गजऱ्यांच्या भावात वाढ झालेली आहे. बाजार समितीत विविध प्रकारच्या फुलांची आवक झालेली आहे, तसेच मोगऱ्याची दीड क्विंटल आवक झालेली आहे.

का वाढले भाव
मोगऱ्याच्या किमती वाढण्यामागे सध्या अनेक कारणे समोर आली आहेत. उन्हाळ्यातील उष्णतेचा परिणाम या फुलांवर झाला आहे. सध्या फुलांना मागणी जास्त व आवक कमी असल्याने भाववाढ होत आहे.

मागील चार दिवसांत मोगरा फुलाच्या भावात रोजच उच्चांक होत आहे. त्यामुळे फुलांच्या दरात तीन दिवसांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तारीख मोगऱ्याचे भाव प्रतिक्विंटल
२८ जून : १५००० ते १६०००
२९ जून : २०००० ते ५००००
३० जून : ७००००
१ जुलै : ८५०००

सणासुदीला गजऱ्याला मागणी
सणासुदीला तसेच लग्नकार्यात मोगऱ्याच्या गजऱ्यांना मोठी मागणी असते. परंतु आता हे गजरेच महाग झाले आहेत. १० रुपयांना मिळणारा गजरा आता २० रुपयांना मिळत आहे. तसेच मोगऱ्याऐवजी पर्यायी फुलांचा वापर केला जात आहे. त्यामुळे गाजरे घेण्यासही महिला आखडता हात घेत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office