Ahmednagar News : राज्यात अनेक ठिकणी माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नगर जिल्ह्यात देखील काही तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वापसा होण्याची वाट पाहत आहेत. त्यानंतर खरीपाची पेरणी करता येईल.
मात्र जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव या तालुक्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. मात्र पुढील चार ते पाच दिवसांनी अहमदनगरसह राज्यभर जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नगर शहराला पिण्यासह शेतीसाठी वरदान ठरलेली धरणे देखील याच भागात आहेत. मात्र पाणलोटात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अद्याप या धरणात नवीन पाण्याची अवाक झालेली नाही. त्यामुळे या भागातीलशेतकऱ्यांसह पर्यटक देखील पावसाची वाट पाहत आहेत.
दरम्यान राज्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर येत्या पाच दिवसांनंतर महाराष्ट्रातील पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा सह्याद्रीवर चढाई करून, सह्याद्रीच्या पूर्वेकडील वर्षाछायेच्या प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मुंबईसह कोकणात जोरदार ते अतिजोरदार तर खान्देश,विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत १८ जूनपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मान्सूनची सध्याची स्थिती आणि पुढील अंदाज याविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली. खुळे म्हणाले, दरवर्षी मान्सूनच्या आगमन व वाटचालीत त्याच्या प्रवाहात दिसणारा जून महिन्यातील कमकुवतपणा या वर्षीही दिसून आला आहे.
अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर फक्त पश्चिमी मान्सून वारे वाहत आहेत. याव्यतिरिक्त मान्सूनसाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रासाठी नव्हती.
म्हणून महाराष्ट्रात मान्सून थांबला आहे. दरवर्षी मान्सून प्रवाह, त्याच्या वाटचालीत केरळ ते कर्नाटक प्रवासानंतर जून मध्यावर सहसा कमकुवत होऊन कर्नाटकातच मुक्काम ठोकत असतो. पण यावर्षी मात्र त्याने महाराष्ट्रात मुक्काम ठोकला आहे.