Ahmednagar News : मान्सून वेळेआधी भारतात दाखल झाला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. राज्यात मागील काही दिवसांपासून काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत आहे. काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस पडत आहे, तर काही भागात मात्र कडक ऊन आणि रात्रीचा उकाडा, अशी स्थिती आहे.
जूनमध्ये देशाने जवळ जवळ सर्वच भागांत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती अनुभवली आहे. तसेच राज्यासह देशाच्या काही भागांत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अनुकूल स्थितीअभावी मान्सूनची वाटचाल मंदावली होती.
आता मात्र येत्या दोन दिवसांत पुन्हा मान्सून सक्रिय होत असून, तो उर्वरित महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा, बिहारचा काही भाग, हिमालयीन प्रदेश, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, ईशान्य बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल, झारखंड आदी भाग व्यापणार आहे.
राज्यासह देशाच्या काही भागांत मान्सूनच्या दोन्ही शाखा मागील सुमारे आठ ते दहा दिवसांपासून पोषक स्थितीअभावी थांबल्या होत्या. त्यामुळे राज्यात आणि देशाच्या काही भागांत किरकोळ पाऊस वगळता उन्हाचा तडाखा वाढला होता.
आता मात्र उत्तर गुजरात, ईशान्य बांगलादेश, आंध्र प्रदेश ते तेलंगण या सर्व भागांत चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकण्यास मदत होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, मान्सूनची गती वाढणार असल्याने २३ जूनपर्यंत राज्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार आहे. मराठवाड्यात मात्र हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.