देशात शेतमालाला दर नसल्यामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. त्यात त्यांना दूध उत्पादनातून थोडाफार आर्थिक फायदा होत होता. मात्र, आता दुधाचे दर देखील सातत्याने कमी होत आहेत. उन्हामुळे दुधाच्या उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत असून दूध उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सात दिवसात निर्णय घेण्याचे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. राज्य सरकारने या संदर्भात सात दिवसात निर्णय घेतला नाही तर, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
सध्या राज्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे, मागील खरिपात जेमतेम पाऊस झाल्यामुळे विहिरींनी डिसेंबर महिन्यात तळ गाठला. परिणामी, शहरासह ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला. शेततळ्यात कमी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे फळबागा जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तापमान जास्त असल्याने फळझाडांचे फळे आणि पानेसुद्धा गळत आहेत.
परंतु आता शेततळ्यातही पाणीसाठा शिल्लक राहिले नाही.शेतीसाठी खर्च वाढत असून त्यातून मिळणारा नफा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेचा कहर आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या संकटात दूध उत्पादक शेतकऱ्यांची सर्व भिस्त दुधावरच होती. परंतु पाणी नसल्याने हिरवा चार मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच अनेकांना विकत चारा घ्यावा लागत आहे. परंतु वाढलेल्या तापमानामुळे दुभत्या जनावरांना त्रास होत असून दूध देण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
पशुखाद्य, चारा यांचे दर वाढले दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुधाचे दर कमी होत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. असे असताना दुसरीकडे पुशखाद्य आणि चारा यांचे दरही वाढले आहेत. त्याचा फटका देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. शेतमालाला भाव नसल्याने आधीच शेतकरी अडचणीत आहेत. आता दुधाच्या दरात घट झाल्यामुळे तो आणखी अडचणीत आला आहे.
राज्यात सध्या उन्हाचा पारा वाढलेला आहे. या वाढलेल्या उन्हामुळे दुधाच्या उत्पादनातही घट झाली आहे. राज्यात पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न, पशुखाद्याचे वाढते दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
काही दिवसांपूर्वी दोन रुपये वाढवलेले गाईच्या दुधाचे दर बहुतांश दूध संघांनी पुन्हा दोन रुपयांनी कमी केले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. अहमदनगरसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांत तीव्र उन्हाळा असल्याने व उष्माची तीव्रता दिसून येत आहे.
तसेच या भागात चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सात दिवसात निर्णय घ्यावा. जर राज्य सरकारने या संदर्भात सात दिवसात निर्णय घेतला नाही तर, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.