Ahmednagar News : तब्बल सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नगर शहरात मोकाट कुत्री व मोकाट जनावरे पकडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खासगी संस्थेमार्फत आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार तातडीची उपाययोजना म्हणून ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
दरम्यान, मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी अद्यापही निविदा प्रक्रिया सुरूच आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या.
या तक्रारींची आयुक्त यशवंत डांगे यांनी दखल घेत मोकाट कुत्रे पकडून त्यांच्या निर्बीजीकरणासाठी तात्पुरत्या स्वरूपात एका खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कुत्रे पकडण्याचे काम सुरू झाले आहे.सोमवारी व मंगळवारी दिवसभरात १० ते १५ मोकाट कुत्री पकडून ती पिंपळगाव माळवी येथील केंद्रात पाठवण्यात आली आहेत.
शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणारी महापालिकेची यंत्रणा वर्षभरापासून ठप्प होती. या कामासाठी मनपाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ आहे. कुत्री, मोकाट जनावरे यांचा तत्काळ बंदोबस्त करण्यासाठी मनपाने हे काम खासगी संस्थेला दिले आहे.
त्यामुळे गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध भागांतून मोकाट कुत्र्यांना पकडण्याचे काम सुरू झाले आहे. शहरात २५ हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणारी यंत्रणा वर्षभरापासून ठप्प होती. त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे नागिरकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान आता ही यंत्रणा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी व मंगळवारी दिवसभरात १० ते १५ मोकाट कुत्री पकडून ती पिंपळगाव माळवी येथील केंद्रात पाठवण्यात आली आहेत.