Ahmednagar News : नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑप. बँकेतील घोटाळ्याप्रकरणी व टॅप्सच्या अनुशंघाने बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे. त्या पत्रात त्यांनी विविध मागण्या करत अनेक आरोपही केले आहेत. नगर अर्बन बँकेला भाजपाच्या माजी खासदाराने बुडविलेले असून काही इतर संचालक व काही वरिष्ठ अधिकारी देखील यात समाविष्ट आहेत.
आरोपींच्या यादीतील पहिली 6 नावे स्व. दिलीप गांधी यांच्या परिवारातील असूनही आरोपी नं. 2 ते 6 यांना अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक केलेली नसल्याचे या पत्रात म्हटले आहे. तसेच भ्रष्टाचाराविरोधात नेहमी आक्रमक बोलणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता या घोटाळयाचा वेगाने तपास होईल व खऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीने कार्यवाही करावी अशी मागणी यात केली आहे.
हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक आदींना देखील पाठवले असल्याची माहिती समजली आहे.
फॉरेन्सिक ऑडीटमध्ये 105 लोक आरोपी
या पत्रात राजेंद्र चोपडा यांनी म्हटलंय की, मी नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड को-ऑप बँकेचा ठेवीदार, खातेदार, सभासद असून रिझर्व्ह बँकेने या बँकेचा परवानाही रद्द केला आहे. या गुन्ह्यामध्ये फॉरेन्सिक ऑडीटमध्ये 105 लोक आरोपी म्हणून निष्पण्ण झाले असल्याचे पत्रात म्हटले आहे.
मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई
या पत्रात त्यांनी असेही म्हटले आहे की, मालमत्ता ताब्यात घेण्याबाबतही अद्याप कार्यवाही दिसून येत नाही. स्व. दिलीप गांधी यांच्या पत्नी सौ. सरोज गांधी यांच्या नावावर आनंदधाम, कोठी रोड, आय.टी.आय. जवळ येथे मोठा बंगलाअसून याबाबत महसूल व पोलीस प्रशासनास देखील याची माहिती आहे.
सुवेंद्र दिलीप गांधी व देवेंद्र दिलीप गांधी या दोघांच्याही नावावर नगर औरंगाबाद रोडवर पांढरीपुलाजवळ शेतजमिनी असल्याचे यात म्हटले आहे. या सर्व जमिनींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी व शासनाचे नाव लावून आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करावा.
आता त्यांनी काही जमीन विकली असेल तर त्या कायद्यातील तरतुदीनुसार ती जप्त करण्यात यावी व त्यांना चौकशीसाठी किंवा अटकेसाठी आणल्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करून त्यांची बेनामी स्थावर मालमत्ता ताब्यात घ्यावी अशी मागणी केली आहे.