अहमदनगर बातम्या

‘मुळा’त १ हजार ८७३ क्युसेकने नवीन आवक, यंदाही भरणार, आज किती टक्के भरलंय धरण? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मे अखेरला विविध ठिकाणचे पावसाचे अंदाज पाहता शेतकरी समाधानी होते. जून महिना उजाडल्यानंतर अवकाळीमुळे अनेकांनी शेतीची कामे करून पेरण्याही सुरू केल्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली.

काही ठिकाणी पिकांपुरता पडत असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. ओलीवर केलेली पेरणी आतापर्यंत तग धरून होती. तसेच मुळा धरणासह अनेक मुख्य धरणांत पाणीसाठा देखील कमी होता. परंतु आता गेल्या दोन दिवसात मात्र पावसाने सर्वत्रच जोरदार हजेरी लावली आहे.

त्यामुळे आता मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली असून आजपर्यंत १ हजार ३७४ दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या ७ हजार २९७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात कोतूळ येथून १ हजर ८७३ क्यूसेसने पाण्याची आवक सुरू आहे. यंदाच्या वर्षी ५ हजार ९२३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

त्यात पावसाने महिनाभर उशीर केल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचेच लक्ष आभाळाकडे लागले होते. मुळा पाणलोट क्षेत्रावर अठवड्याभरापासून पावसाचा जोर वाढू लागल्याने मुळा धरणाकडे पाण्याची आवक सुरू झाली आहे. यंदाही मुळा धरण भरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

दक्षिणेतही जोरदार
गेल्या दोन दिवसात जामखेड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जामखेड मंडळात ९३.५, खर्डा ९२.३, नान्नज ६२ व नायगाव मंडळात ९३.५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

मागील काही वर्षातील आजच्या तारखेची मुळा धरणाची आकडेवारी


२०२० : ८ हजार ४१६ दशलक्ष घनफूट
२०२१ : ९ हजार २३३ दशलक्ष घनफूट
२०२२ : ९ हजार १६० दशलक्ष घनफूट

२०२३ : ९ हजार ६५५ दशलक्ष घनफूट
२०२४ : ७ हजार २९७ दशलक्ष घनफूट

Ahmednagarlive24 Office