Ahmednagar News : ना वेळेत पाणी, ना घंटागाडी..! प्रचाराच्या रणधुमाळीत नगरकरांचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित, माजी नगरसेवक प्रचारात तर अधिकारी इतर कामात व्यस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सध्या नगर शहरात लोकसभेच्या दृष्टीने चांगलीच पळापळ, धावपळ दिसत आहे. यंदाची निवडणूक काही वेगळीच असून अगदी घासून निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची राजकीय मंडळी प्रचारात गुंतली आहे.

महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी डिसेंबर मध्ये संपला व अवघ्या काही महिन्यांत लोकसभा लागली. त्यामुळे माजी नगरसेवक प्रचारात तर मनपाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने शहरातील मूलभूत प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत.

यामध्ये पाणी, कचरा, बंद पथदिवे, मोकाट कुत्री जनावरे तसेच रखडलेली नालेसफाई आदी अनेक प्रश्न प्रलंबित असून नागरिक चांगलेच वैतागले असल्याचे चित्र आहे.

वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा आणि सदोष वितरण व्यवस्थेमुळे नागरिकांना वेळेत व पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. शहरात अनेक भागात तीन ते चार दिवस घंटागाडी जात नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा फेकून देत आहेत.

पर्यायाने शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. लख्ख प्रकाश आणि वीजबिलात कपात व्हावी, या उद्देशाने शहरात मनपाने स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविला. मात्र ही योजना अपयशी ठरली आहे. मनपाला वीजबिल आहे तेवढेच येत असून अनेक ठिकाणी पथदिवेही बंद आहेत. सध्या या योजनेच्या ठेकेदारानेही नव्याने दिवे लावण्याचे काम बंद केले आहे.

नालेसफाई करायला कुणी धजेना, कारण..अतिक्रम..!
पावसाळा तोंडावर असताना अद्याप मनपाकडून नालेसफाईचे काम हाती घेण्यात आलेले नाही. दोनदा निविदा काढूनही ठेकेदरांनी या कामाला प्रतिसाद दिलेला नाही. शहरात ४१ ओढे-नाले असून ते अतिक्रमणाने वेढलेले आहेत.

त्यामुळे सफाईसाठी नाल्यांमध्ये मशीन जात नाही. नाल्याच्या काठावरच अनेक ठिकाणी भिंती घातल्याने गवत आणि गाळ कसा उपसायचा असा प्रश्न पडतो. त्यामुळे हे काम करण्यासाठी मनपाला ठेकेदार मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

कुत्र्यांचाही हौदोस
मागील अनेक महिन्यांपासून शहरातील मोकाट कुत्रे व जनावरे पकडणारी महापालिकेची यंत्रणा ठप्प असल्याने शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली दिसते.रात्री-अपरात्री कुत्र्यांच्या टोळ्ळ्या वाहनचालकांचा पाठलाग करतात. यामुळे छोटे-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे

इतरही अनेक प्रश्न
शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था आहे. पावसाच्या आधी मनपाने खराब रस्स्त्यांची पॅचिंग करणे गरजचे आहे. यासोबत अनेक मूलभूत प्रश्नही आ वासून उभे आहेत.

कार्यकाळ संपताच नगरसेवकांचीही पाठ
नगरसेवक म्हणून कार्यरत असताना जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरणारे काही नगरसेवक आता महापालिकेत फिरकत नसल्याचे व आपल्या प्रभागातील नागरिकांनाही भेटत नसल्याचे चित्र आहे. कुणी काही समस्या मांडल्या की आता आमच्या हातात काही नाही असे सांगून बोळवण होते असे काही नागरिक सांगतात.