Ahmednagar News : शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनाकरिता संपूर्ण भारतातून करोडो भाविक हजेरी लावत असतात. त्यांच्या सोबत मातृभाषेतून संवाद साधल्यामुळे भक्तांना संस्थानबद्दल आपुलकी व विश्वास निर्माण होईल संस्थान आणि भाविक यांच्यातील संबंध मजबूत होतील. त्याद्वारे भाविकांना चांगली सेवा प्रदान करता यावेत यासाठी साई संस्थानच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना आता तेलगू भाषा बोलण्याचे शिकवली जात आहे.
देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी साई संस्थानच्या सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना भाषेच्या अडचण निर्माण होत असल्याने तेलगू भाषेचे जुजबी ज्ञान व्हावे, यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे सुरक्षा विभागाचे पोलिस अधिकारी रोहिदास माळी यांनी दिली.
श्रद्धा व सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनाकरिता संपूर्ण भारतातून करोडो भाविक हजेरी लावत असतात. यामध्ये उत्तर भारतातील भाविक हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांच्याशी संवाद करण्यात अडचण येत नाही; परंतु दक्षिण भारतातील भाविकांसोबत संवाद करण्यासाठी तेलगू भाषेची अडचण येत असते.
वर्षभरात साईबाबांच्या दर्शनासाठी दक्षिणेतील भाविक जास्त प्रमाणात शिर्डी येथे येत असतात. बऱ्याच वेळा भाषेचा अडसर असल्यामुळे संस्थान कर्मचारी आणि भाविक यांच्यामध्ये त्रेधातिरपिट होत असते. मातृभाषेतून संवाद झाला तर भक्तांना आपुलकी वाटते. त्याकरिता साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांच्या सुचनेनुसार सर्व संस्थानच्या कर्मचाऱ्यांना तेलगू भाषेचे जुजबी ज्ञान व्हावे, यासाठी भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येत आहेत.
त्या अनुषंगाने संरक्षण विभागातील सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांच्यासह सुरक्षा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे आता साई संस्थानच्या सुरक्षा विभागातील कर्मचारी मराठी, हिंदीसॊबत तेलगू भाषेत देखील संवाद साधू शकतील.