अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : आता अहमदनगरमधील ‘त्या’ मोठ्या पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक, संचालकांकडून अपहार, बेनामी मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला सहकाराची मोठी परंपरा आहे. परंतु मागील वर्षभरापासून अहमदनगर जिल्ह्यातील मल्टीस्टेट व पतसंस्थेतील गैरप्रकार समोर आले आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक झाले आहेत.

या पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संस्थेच्या शेकडो ठेवीदारांनी पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.  राजे शिवाजी पतसंस्थेकडे तालुक्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी आहेत.

१०० कोटींच्या ठेवी संस्थेकडे असून संचालक मंडळाने ठेवीदारांना विश्वासात घेऊन ठेवींवर जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून ठेवी जमा केल्या आहेत. संस्था अतिशय मजबूत आहे. संस्था मोठी आहे. संस्थेची फार मोठी गुंतवणूक आहे. संस्थेचे स्वतःचे मोठे भागभांडवल आहे. मोठी मालमत्ता आहे, अशी खोटी प्रलोभने दाखवून ठेवीदारांना आकर्षित केले, असे निवेदनात म्हटले आहे.

गेल्या आठ, दहा महिन्यांपूर्वी संस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याची चर्चा सुरू झाली. संस्थेचे अध्यक्ष आझाद ठबे यांनीच संस्थेकडन विनातारण व बेकायदेशीर कोट्यवधी रुपयांची कर्ज उचलल्याचे लेखा परीक्षणावरून उघड झाले. ठेवीदारांनी संस्थेकडे ठेवींच्या सुरक्षिततेविषयी विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही.

सर्व ठेवी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. अधिक चौकशी करण्यात आली असता संचालक मंडळाने बेकायदा कर्ज उचल करून परतफेड केली नाही. संस्थेकडे वेळोवेळी आमच्या ठेवी. बचत खात्यावरील रक्कम मिळावी याची मागणी करण्यात आली.

मात्र, ठेवी अथवा बचत खात्यावरील रक्कम मिळाली नाही. संस्थेचे संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालकांनी ठेवी परत करण्यास नकार दिला, असे ठेवीदारांनी निवेदनात म्हटले आहे.

विविध आरोप
संस्थेचे अध्यक्ष आझाद ठुबे व त्यांच्या नातेवाईकांकडे तीस ते चाळीस कोटी रुपये आहेत. त्यामुळे संस्था अडचणीत आल्याचा आरोप रामदास घावटे यांनी केला. तर संस्थेच्या संचालक मंडळाने अपहराच्या रकमेतून बेनामी मालमत्ता विकत घेतल्या. करचुकवेगिरी, सावकारी, काळा पैसा पांढरा करणे असे गंभीर गुन्हे स्वरूपाचे गुन्हे केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office