Ahmednagar News : जगात दररोज नवनवीन संशोधने होत आहेत. आता सध्या आपण मोबाईल किंवा पडद्यावरून जो आभासी संवाद साधतो तो आता थेट तुमच्या चष्म्यातून संवाद साधला जाऊ शकतो. स्मार्ट चष्मे वापरून विविध वापरकर्त्यांमध्ये आभासी संवाद सत्र आयोजित केले जाऊ शकते. होय हे खरे आहे.
या नव्या तंत्रज्ञानामुळे जगात आभासी संवादाच्या नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या या आगळ्यावेगळ्या संशोधनात सहभागी असलेल्या अमेरिकन संशोधकांच्या पथकात डॉ. हेमंत भास्कर सुरळे या कोपरगाव येथील युवा संशोधकांचा समावेश आहे. त्यांनी या संशोधनाची चार डॉ. हेमंत सुरळे पेटेंट सादर केली. त्यापैकी एकास मान्यता मिळाली आहे.
या प्रणालीमध्ये एखादा युजर्स चष्म्यातील कॅमेरा आणि डिस्प्ले वापरून इतर युजर्सशी वास्तविक वेळेत संवाद साधू शकेल. वापरकर्ते आभासी माध्यम वस्तूंचा वापर करून संवाद साधू शकतात. ज्यामुळे वास्तविक जगातील वातावरणात आभासी वस्तू समाविष्ट करता येतात. या तंत्रज्ञानामुळे आभासी संवाद अधिक वास्तविक वाटतो.
डॉ. हेमंत यांचे वडील भास्कर सुरळे हे कोपरगाव येथील रहिवासी असून, जलसंपदा विभागातील निवृत्त उपविभागीय अभियंता आहेत. कॅनडा येथील वॉटरलू विद्यापीठातून डॉ. सुरळे याने विशेष प्रावीण्यांसह कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट मिळविली. पीएच. डी. करीत असताना त्यांचे तीन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकृत व प्रसिद्ध झाले. परिणामी त्यांना अमेरिकेतील प्रथितयश कंपनी स्नॅप फाउंडेशनची फेलोशिप सन २०१९ मध्ये प्राप्त झाली.
तेथे त्यांनी कॉम्प्युटर सायन्समधील भविष्यातील संवर्धित वास्तविकता, आभासी वास्तविकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर सहकाऱ्यांबरोबर वेगवेगळे संशोधन प्रकल्प पार पाडले. हे नवे आभासी तंत्रज्ञान शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक संवादात प्रभावी ठरेल.
विद्यार्थी आणि शिक्षकांना आभासी वर्गात अधिक प्रभावीपणे संवाद साधता येईल. व्यवसाय क्षेत्रात, कंपन्या आभासी बैठका आणि सादरीकरण आयोजित करू शकतात. ज्यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होईल. सामाजिक संवादासाठी हे तंत्रज्ञान लोकांना त्यांच्या मित्र-परिवारासोबत अधिक जिव्हाळ्याचा अनुभव देऊ शकते.
एका पेटेंटला मान्यता
या संशोधनाची चार पेटेंट सादर केली. त्यातील एका पेटेंटला मान्यता मिळाली आहे. सध्याचे हे पेटंट अमेरिकेत प्रकाशित झाले आहे. युरोप, कोरिया आणि चीनमध्ये देखील ते प्रकाशित होणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे.