Ahmednagar News : नगरकरांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आली आहे. महापालिकेने मालमत्तांबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिका शहरातील सर्व मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन करणार आहे.
या कामासाठी दिल्ली येथील मे. सीई फंन्फो सिस्टम लि. या कंपनीची निवड करण्यात आली असून तिला हे काम दिले आहे. या माध्यमातून कर आकारणी न होणाऱ्या मालमत्ता, अनधिकृत नळ कनेक्शन समोर येणार आहेत.
शहरात नगर परिषद असताना सन २००२ मध्ये मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करून कर आकारणी निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात दर पाच वर्षांनी मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करण्याचा नियम आहे. मात्र, महापालिका अस्तित्वात आल्यानंतर असे सर्वेक्षण झालेच नाही. मनपाने सन २०१२ मध्ये कोलकाता येथील कंपनीला जीआयएस प्रणालीद्वारे मालमत्ता सर्वेक्षणाचे काम दिले होते.
या कंपनीने हे काम पूर्ण केले नाही. त्यानंतर २०२१ मध्ये महासभेने मंजुरी दिल्यानंतर मनपाने या कामाच्या संदर्भात निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. मालमत्तांचे सर्वेक्षण न झाल्याने कर आकारणीचेही फेर मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे २००५ मध्ये निश्चित केलेल्या दरानुसारच आकारणी सुरू आहे. सर्वेक्षणानंतर नवीन मालमत्ता करकक्षेत येऊन मनपाचे उत्पन्न वाढणार आहे.
अशा पद्धतीने सर्वेक्षण होईल
सर्वेक्षणात इमारती, बांधकाम, त्याचा प्रकार, वय, त्यांचे फोटो, संगणकीकृत नकाशे, जिओ टॅगिंग, तसेच अंतर्गत-बाह्य मोजमाप, कारपेट व बिल्डअप क्षेत्र आदींचे मोजमाप करून त्याचे कर मूल्य आदींचा डेटा एकत्र केला जाणार आहे.
लपविलेल्या मालमत्ता कर कक्षेत येणार
मागील काही वर्षांत शहराचा मोठा विस्तार झाला आहे. अनेक ठिकाणी नव्याने बांधकामे झाले असून जुनी घरे पाहून इमारती उभा केल्या आहेत. अशा ठिकाणी मात्र जुनीच कर आकारणी केली जाते. सर्वेक्षणात या सर्व मालमत्ता कर कक्षात येणार आहेत. शहरात सद्यःस्थितीला निवासी व अनिवासी अशा दीड लाखांच्या आसपास मालमत्ता असल्याचा मनपा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
सर्वेक्षणाबाबत नागरिकांना तक्रार करता येणार
शहरात मालमत्ता सर्वेक्षसणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख तपासून त्यांना सहकार्य करा, तसेच त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.
या सर्वेक्षणामुळे मनपाच्या उत्पन्नात वाढ होऊन आवश्यक त्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे. सर्वेक्षणादरम्यान नागरिकांना मनपाच्या ई- मेलवर लेखी तक्रार करता येणार असल्याचे जावळे यांनी सांगितले.