Ahmednagar News : पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. शहरात मानवी वस्ती मोठी आहे, तसेच जुन्या घरांची संख्याही आहेच. अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाल्याने पाणी वाहण्यास रस्ता नाही अशी स्थिती असते.
तसेच आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले व गटारींची महापालिकेकडून सफाई केली जाते. परंतु यंदा मात्र, पावसाळा तोंडावर आला, तरी गटार व नालेसफाईला अद्याप प्रारंभ झालेला नाही.
दरम्यान आता या कामांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अत्यावश्यक बाब म्हणून जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन या कामांसाठी ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देणार असल्याचे महपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे.
नगर शहरात पावसाळ्यात नाले व गटारी तुंबून अनेकदा पूर परिस्थिती उद्भवून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मनपाकडून ओढे-नाले व गटारांची पावसाळ्यापूर्वी सफाई केली जाते.
यासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेली आहे. या कामांसाठी मनपाकडून निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराची नियुक्ती केली जाते. यावेळी मनपाने नालेसफाईसाठी दोनवेळा निविदा प्रक्रिया राबविली
मात्र, ठेकेदार संस्थांकडून प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्यांदा निविदा जाहीर केल्यानंतर एका ठेकेदाराचा प्रतिसाद मिळाला. आता गटार व नालेसफाईच्या निविदांची छाननी प्रक्रिया सुरू आहे
खरोखर साफसफाई होईल की नगर तुंबेल?
मागील वर्षी पावसाचे प्रमाण तसे अत्यल्प राहिले. परंतु गणपती उत्सवाच्या काळात जोरदार पाऊस झाला. या पावसाने उड्डाणपुलाखालील रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.
रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारींमधून पाणी वाहून न गेल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले होते. याबाबत नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. आता यंदा शहरातील तुंबलेल्या गटारी व्यवस्थित साफ होतील का? हे पाहणे गरजेचे आहे.
अतिक्रमणाचा वेढा
शहरात जवळपास ४१ ओढे-नाले असून बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालेलं दिसून येते. काही ठिकाणी प्रवाह बंदिस्त करून वळविण्यात आले तर काही ठिकाणी नाले बुजवून त्यावर बांधकामे करण्यात आलेले असल्याने असे ओढे-नाले साफ कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.