Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणी आता तपासाने वेग घेतला असून यात आता आणखी एका अधिकाऱ्यास ताब्यात घेतले आहे. नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या २९१ कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी बँकेच्या आणखी एका अधिकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा पथकाने त्याला नगरमध्ये आणले. फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानुसार पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे.
काही संचालक व अधिकारी, कर्जदारांना अटकही करण्यात आली आहे. तसेच, इतर काही अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यात डोळे यांच्यावर संशय आल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
डोळे हे बँकेच्या मुख्यालयात कर्ज विभागात अधिकारी होते. दरम्यान, डोळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीनंतर गुन्ह्यात त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येईल, असे उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.
राजेंद्र चोपडा यांचे ‘ते’ पत्र
नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑप. बँकेतील घोटाळ्याप्रकरणी व तपासाच्या अनुशंघाने बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिले होते. त्या पत्रात त्यांनी विविध मागण्या करत अनेक आरोपही केले होते.
नगर अर्बन बँकेला भाजपाच्या माजी खासदाराने बुडविलेले असून काही इतर संचालक व काही वरिष्ठ अधिकारी देखील यात समाविष्ट आहेत. आरोपींच्या यादीतील पहिली 6 नावे स्व. दिलीप गांधी यांच्या परिवारातील असूनही आरोपी नं. 2 ते 6 यांना अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक केलेली नसल्याचे या पत्रात म्हटले होते.
तसेच भ्रष्टाचाराविरोधात नेहमी आक्रमक बोलणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता या घोटाळयाचा वेगाने तपास होईल व खऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीने कार्यवाही करावी अशी मागणी यात केली होती.