मंजूर कामांना स्थगिती आणणारेच उद्घाटनासाठी पुढे ! आ. तनपुरेंचा कर्डिलेंवर घणाघात

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics :  महाविकास आघाडीतील मंजूर कामांना ज्यांनी स्थगिती आणली, तेच आता कामाचे उ‌द्घाटने करण्यासाठी साडेचार वर्ष झोपलेले झोपेतून जागे झाले आहेत. सध्याच्या महायुती सरकारने मागील काळातील कामांना स्थगिती दिल्याने मोठा विकासाच्या कामांना खंड पडला.

या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली. तेथून न्याय मिळाल्याने आम्ही मंजूर करून आणलेल्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला. भारतीय जनता पक्षाने शिवसेना व राष्ट्रवादी फोडून राजकारणाला विकृत वळण लावले, अशी घणाघाती टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

सोनगाव, धानोरे, तुळापूर या गावांमध्ये आयोजित विविध कार्यक्रमप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मण अंत्रे होते. यावेळी किरण कडू, जयराम दिघे, प्रेरणा मल्टिस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे, चंद्रभान अंत्रे, योगेश चोरमुले, सागर डुक्रे, सिताराम दिघे, सरपंच गणेश हारदे, पोपट दिघे, सुर्यभान शिंदे, शिवाजी अनाप, दत्तात्रय पडघलमल,

आकाश पडघलमल संजय कडू उपस्थित होते. आमदार तनपुरे म्हणाले, की राहुरी- नगर- पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सुमारे ३० कोटी रुपये खर्चाची विकास कामांना मंजुरी मिळालेली होती; परंतु पक्ष फोडून सत्तेवर आलेल्या महायुतीने सरकारने स्थगिती दिली. या निर्णयाच्या विरोधात न्यायलायात धाव घेऊन न्याय मिळविला. त्यानंतर सध्याचे शासन जागे झाले. ज्या लोकांनी स्थगिती आणली ते आता श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहेत.

शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना महायुतीचे सरकार राजकारण करण्यात दंग झाले आहे. सध्याच्या सरकारने विविध योजना आणून सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने गेले साडेचार वर्षे घरात झोपून राहिलेले जनता दरबार घेत आहेत.

मी राज्यमंत्री असताना मतदारसंघात ४०० नवीन रोहित्रे बसविली. आमच्याच काळात सुमारे ४६ कोटी रुपये खर्चाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव दाखल झालेला होता. गेल्या दहा वर्षाच्या काळात राहुरी बस स्थानकाला एक विटही लावली नाही.

आमदार असताना यांना कधी प्रशासकीय इमारतीचा प्रश्न, ग्रामीण रुग्णालय, बस स्थानकाचे प्रश्न कधी दिसले नाही व आता आम्ही ते प्रश्न आमच्या सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मंजूर करून आणले तेच प्रश्न घेऊन श्रेय घेत असल्याची टिका केली. यावेळी किरण कडू, लक्ष्मण अंत्रे यांची भाषणे झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe