अहमदनगर बातम्या

खरिपावर रोगांचा प्रादुर्भाव ! सोयाबीन,मूग, मकाला अळीने पकडले, रोखायचं कस?

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील खरीप पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा मोठा पेरा आहे. ढगाळ वातावरणामुळे ‘स्पोडोप्टेरा’चा म्हणजे तंबाखूवरील पाने खाणारी अळीचा पिकावर हल्ला होतो. याच हल्ल्यात काही सेकंदांत पानांची चाळण होते.

काही दिवस असेच वातावरण राहिल्यास तंबाखूवरील पाने खाणारी अळी देखील सोयाबीनवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करता वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केले तर नुकसान टाळता येईल, अशी माहिती कृषी विभागातील तज्ज्ञांनी दिली.

नगर तालुक्याचा जर विचार केला तर येथे मोठ्या प्रमाणात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु सूर्यप्रकाशाचा अभाव… ढगाळ वातावरण अन् सतत पडणारा रिमझिम पाऊस यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिके रोगाला बळी पडली आहेत. मूग, सोयाबीन, बाजरी, उडीद, मका व इतर चारा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

रोगांच्या प्रादुर्भावामुळे खरिपातील उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनदेखील सूर्यप्रकाशाअभावी रोगांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. सोयाबीन व कपाशीवर कीड रोग व रस शोषण अळीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकांची उत्पादकता घटण्याची शक्यता राहते.

‘खादाड’ अळीला रोखणार कसे ?
या अळीला रोखण्यासाठी पिके प्रथम स्टेजवर असल्यानंतर लिंबोळी अर्कची फवारणी करावी. जर मोठ्या प्रमाणावर खादाड अळीचा प्रादुर्भाव वाढला, तर कीटकनाशक फवारणीशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही.

कांद्याच्या रोपांची मर बुरशीने पीछेहाट; बाजरीचा केला अळीने घात !
मका, बाजरी पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो, तर कांद्याच्या रोपांची मर व बुरशीजन्य रोगाने वाताहत झाली आहे. तालुक्यात लाल, तसेच गावरान कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते.

परंतु कांद्याची रोपे सुमारे ७० ते ८० टक्के वाया गेल्याने कांद्याच्या क्षेत्रात घट होणार आहे. खरीप हंगामातील पिकांवर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट होऊन केलेला खर्चही वसूल होतो की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

कृषी विभागाचा घ्या सल्ला
सूर्यप्रकाशाअभावी रोग नियंत्रणात येण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्याने उच्च प्रतीच्या बुरशीनाशक, कीटकनाशक औषधांची फवारणी करावी असे प्रतिपादन सिद्धार्थ क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office