Ahmednagar News : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्ताने दरवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्य जीवन गौरव आणि कलागौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या वर्षीची पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यीक डॉ.प्रेमानंद गज्वी,
राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार डॉ.समीर चव्हाण, राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार, अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार डॉ.श्रीनिवास हेमाडे, डॉ.विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार प्राजक्त देशमुख आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना देण्यात येणार असल्याची माहीती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिली.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने दरवर्षी या साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदाचे हे ३४ वर्ष असून, डॉ.विखे पाटील यांच्या १२४ व्या जयंती दिना निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या हस्ते नारळी पोर्णीमेच्या दिवशी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक डॉ.राजेंद्र सलालकर यांनी सांगितले.
डॉ.प्रेमानंद गज्वी (मुंबई) हे मराठी नाटककार, कवी, विचारवंत म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जीवनभर त्यांनी लेखन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव हा त्यांच्या लेखणीतून कायम दिसून आला. त्यांच्या प्रत्येक नाटकात समाजातील एखाद्या समस्येवर प्रखर प्रकाश झोत टाकलेलाच दिसतो. वंचित, पिडीतांचा दबलेला आवाज मुखर करण्यासाठी जीवनभर प्रतस्तपणे काम करणा-या साहित्य निष्ठेचा गौरव यंदाचा पद्मश्री डॉ.विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार देवून करण्यात येणार असून, स्मृतीचिन्ह, १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याचे डॉ.कसबे म्हणाले.
डॉ.विखे पाटील राज्यस्तरीय सर्वौत्कृष्ठ साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आलेले डॉ.समीच चव्हाण (कानपुर) आय.आय.टीमध्ये गणिताचे प्राध्यापक असून, साहित्य हा त्यांच्या आवडीचा प्रांत आहे. संत तुकारामांच्या जीवनाचे विश्वदर्शन घडविण्यासाठी ‘अखई ते जाले’ हा ग्रंथ त्यांनी शब्दबध्द केला. या माध्यमातून संत तुकारामांना अधिक उंचीवर नेण्याचा केलेला यशस्वी प्रयत्नांची दखल पुरस्कार निवड समितीने घेतली असून, रुपये ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह अशा विशेष साहित्य पुरस्काराने त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
प्रफ्फुल शिलेदार (नागपुर) यांच्या ‘हरविलेल्या वस्तुंचे मिथक’ या कविता संग्राहास डॉ.विखे पाटील अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार जाहिर झाला असून, स्मृतीचिन्ह आणि २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रफ्फुल शिलेदार यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मुंबई शहराचे रुपक घेवून मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा आलेख मांडण्याचा प्रयत्न आपल्या कवितांमधून केला आहे. त्यांची कविता मुशाफिरी व मानवी मनाला चिंतनशिल करणारी आहे. या कवितांचे वेगळेपण विचारात घेवून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला आहे.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार प्रा.डॉ.श्रीनिवास हेमाडे (संगमनेर) यांना घोषित झाला असून, ‘पेचामध्ये अडकलेल्या अडीच हजार वर्षातील तत्वज्ञानाचा प्रवास’ डॉ.हेमाडे यांनी अत्यंत सुलभ भाषेत लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. तत्वज्ञान हे जीवनाचे स्पष्टीकरण करणारे आणि त्याला दिशा देणारे शास्त्र आहे. त्याचा प्रभाव वर्तमान व सांस्कृतीक प्रवाहात टाळता येत नाही यासाठी त्यांनी शब्दबध्द केलेला तत्वभान ग्रंथ हा निश्चित उपयोगी पडेल असे समितीला वाटत त्यामुळेच त्यांचा सन्मान समितीने स्मृतीचिन्ह आणि १० हजार रुपये देवून करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील नेवासा येथील प्रा.बाळासाहेब लबडे (नेवासा) यांचे ‘काळ मेकर लाइव्ह’ या कांदबरीला अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार देण्यात येणार असून, स्मृतीचिन्ह आणि २५ हजार रुपये देवून करण्यात येणार आहे. समाज माध्यमांव्दारे माहितीचा महापुर आल्यानंतर जे जीवनाचे भेसूर आणि अराजकीय वास्तव निर्माण झाले आहे. त्याचे नव्या तंत्रशैलित चिंत्रण करणारी ही कांदबरी असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
नाट्यलेख आणि दिगदर्शक प्राजक्त देशमुख (नाशिक) यांच्या ‘संगीत देवभाबळी’ या नाटकामुळे संगीत नाटकाला पुन्हा उर्जितावस्था मिळाली. एक अभिनेता म्हणूनही त्यांनी नाट्यक्षेत्रात आपले एक वेगळे वलय निर्माण केले. नव्या दमाचा, नव्या पिढीचा हा नाटककार मराठी नाट्य परंपरेला निश्चित पुढे नेईल असा विश्वास पुरस्कार निवड समितीला असल्यामुळे राज्यस्तरीय नाट्यगौरव पुरस्कार देवून त्यांचा सन्मान देवून स्मृतीचिन्ह आणि २५ हजार रुपये देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे सुपूत्र असलेले हसन शेख पोटेवाडीकर (कर्जत) यांना यंदाचा डॉ.विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असून, नाट्य कलावंत कांताबाई सातारकर, रघुवीर खेडकर यांच्या समवेत त्यांनी तमाशा मंडळात काम केले. वगनाट्या मध्ये स्वतंत्र महत्वाच्या भूमिका करुन त्यांनी तमाशा कलेमध्ये आपले वेगळेपण सिध्द केले आणि स्वत:चाच तमाशा फड सुरु केला.
महाराष्ट्राची लोकधारा व लोकपरंपरा जपतानाच ग्रामीण महाराष्ट्राचे मनोरंजन व समाज प्रबोधन करण्याच्या कार्याची दखल घेवून पुरस्कार निवड समितीने यंदाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असून, त्यांना स्मृतीचिन्ह आणि २५ हजार रुपये देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या पुरस्कार निवड समितीमध्ये डॉ.रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.एकनाथ पगार, डॉ.दिलीप धोंडगे व डॉ.राजेंद्र सलालकर यांचा समावेश होता.