Ahmednagar News : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना सुमारे आठ दिवसांपूर्वी १९ एप्रिल रोजी घडली होती. याबाबत नातेवाईक असलेल्या एका संशयितावर शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडून आठ ते दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे मात्र अजूनही या मुलींचा तपास लागलेला नाही. यामुळे सदर मुलींचे आई वडील, नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून या घटनेचा तातडीने तपास लावावा , अशी मागणी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यंच्याकडे करण्यात आली.
खैरे यांची भेट घेऊन याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांना देण्यात आले आहे. सदर मुली सुरक्षित मिळाल्या नाहीत तर शेवगाव पोलीस ठाण्याच्या प्रांगणात प्रसंगी बेमुदत उपोषण आंदोलन पुकारण्याचा निर्धार निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, सदर तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेले जात असताना नातेवाईकांनी करंजी घाट येथे फोन करून या घटनेची मामाला माहिती दिली.
सदर मुलींचे आई वडील साखरपुड्याच्या निमित्ताने बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. आरोपीचे नाव व त्याचा मोबाईल नंबर याचा उल्लेख फिर्यादीत केलेला आहे. मात्र अजूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे सदर मुलींचे आई वडील व नातेवाईकांची चिंता वाढली आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे उपस्थित होते.
कॉम्रेड संजय नांगरे, आकाश दौंड, संध्या मेढे, फिरोज शेख, भैरवनाथ वाकडे, संतोष गायकवाड, लता बोरुडे, किशोर जाधव, उज्वला जाधव, रामदास जाधव, वनिता जाधव, अलिशा शिंदे, आशा साठे, मीरा बानाई, सुनीता सूर्यनारायण आदी उपस्थित होते.