Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील गुंतवणुकदारांना सुमारे २० कोटी रूपयांची टोपी घालणारा एसबी इन्व्हेस्टीमेंटचा संचालक शेअर ट्रेडर सुदाम बवीराल याला गुंतवणूकदारांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र रात्री पोलिसांनी त्याला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे संतापलेल्या गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत कथित शेअर मार्केट प्रकरणात एजंटांकडून फसवणूक झालेले गुंतवणूकदार, तसेच नागरिकांनी सोमवारी (दि.१७) सकाळी अकराच्या सुमारास शेवगाव पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर ठाण मांडले. शेवगाव ते पैठण रस्त्यावर रास्ता रोको करून संताप व्यक्त केला.
चापडगाव (ता.शेवगाव) येथील नागरिकांची एका शेअर मार्केट एजंटने फसवणूक करून पळ काढला होता. तो गावात आल्याची माहिती मिळताच, लोकांनी शोध घेऊन त्यास पकडले. त्यानंतर पोलिसांना कळवत त्यांच्या ताब्यात दिले. मात्र, शेवगाव पोलिसांनी त्या एजंटला रात्री उशिरा सोडून दिले.
हा प्रकार रविवारी (दि.१६) घडला त्याला सोडून दिल्याची माहिती मिळताच, शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, भाकपचे कॉ. संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखाली पन्नास ते साठ नागरिकांनी सोमवारी सकाळी पोलिस ठाण्यात दाखल होऊन पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्यासमोर संताप व्यक्त केला. पोलिसांनी संबंधिताला सोडून दिल्यावर त्याने अनेकांना धमकावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चापडगाव येथील सुदाम बबीरवाल हा ट्रेडिंग व्यावसायिक चार महिन्यांपासून अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झाला होता. काही गुंतवणूकदारांनी त्यास रविवारी पोलिसांच्या हवाली करीत त्यावर कारवाईची मागणी केली.
पोलिस निरीक्षकांनी यावेळी कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, नंतर सदर व्यावसायिकावर कारवाई न करता त्याला सोडून देण्यात आले. हे समजताच संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल बागुल यांनी मध्यस्थी करून कारवाईचे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
उपअधिक्षक करणार कारवाई
रास्ता रोको आंदोलन मागे घेतल्या नंतर आंदोलकांनी पोलीस उपअधिक्षक सुनील पाटील यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस अधिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अश्वासन पाटील यांनी आंदोलकांना दिले.
पोलिस निरीक्षकाविरोधात तक्रार
दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी गदेवाडी येथील शेअर व्यावसायिक अक्षय इंगळे व अविनाश इंगळे यांच्यावर २६ गुंतवणूकदारांना ८३ लाख रुपयांना फसविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी काही गुंतवणूकदार इंगळे यांची तक्रार देण्यास येतात. मात्र, पोलिस निरीक्षक दाखल गुन्ह्यात त्याचा समावेश करण्याऐवजी आलेल्या तक्रारदारांना हाकलून देत असल्याची तक्रार पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असल्याचे समजते.