Ahmednagar News : जनतेचा कौल मान्यच; कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ‘ती’ मागणी केली, यात राजकारण आणू नका..!

Pragati
Published:

Ahmednagar News : जनतेने दिलेला कौल तेव्हा व आता देखील मान्य आहे. केवळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रहामुळे काही ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत यापूर्वीच सर्वकाही सांगितले आहे. त्यामुळे यात कोणीही राजकारण आणू नये. असे डॉ. विखे पाटील म्हणाले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील ४० बूथवरील ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी केली.

याबाबत विद्यमान खासदार निलेश लंके म्हणाले होते की, सुजय विखे पाटील हे त्यांच्या कर्तृत्वामुळे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे त्यांनी ईव्हीएमवर खापर न फोडता पराभव मान्य करावा. जसा विजयाचा आनंद पचविता आला पाहिजे तसाच पराभवही पचविता आला पाहिजे.

माझ्या सभांच्या व्हिडीओ चित्रीकरणाची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. तुम्ही पराभव मान्य करायला शिका. समाजापुढे जाताना सांगू शकत नाहीत की माझ्या कर्तृत्वामुळे पराभूत झालो. आता ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचे सांगून समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हणाले होते.

यावर भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रहामुळे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील ४० बूथवरील ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सदरील निकाल आम्ही स्वीकारलेला आहेच. परंतु मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी आपल्या गावातून पडलेले मतदान आम्हाला मान्य नसल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या मानसिक समाधानासाठी,आपण ही मागणी आपण केली आहे.

ही प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनातील भावनांचे निरसन होईल, असा मला विश्वास आहे. यासाठी न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांना अधीन राहून दिलेल्या विहित मुदतीत आपण आयोगाकडे या मागणीचा अर्ज दाखल केला आहे.

यासाठी आयोगाकडे नियमाप्रमाणे फी जमा केली आहे. लोकसभा निवडणुकीत मला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली आहेत. त्यामुळे कोणीही राजकारण आणू नये असे विखे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe