Ahmednagar News : कोणत्या प्रकारचा गुटखा, मावा अथवा नशा करणे शरीरासाठी अपायकारकच आहे . मात्र तरीदेखील अनेकजण सर्रास मावा , गुटखा खातात.परिणामी या मधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने अनेकजण शरीरासाठी घटक पदार्थ टाकतात. स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये सुरू असलेला असाच एक बनावट गुटख्याचा कारखाना मंगळवारी उद्ध्वस्त केला.
या कारवाईत पोलिसांनी गुटखा बनविण्याचे साहित्य, मशिनरी, बनावट तयार गुटख्याचे पॅकिंग असा २२ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला श्रीरामपूर एमआयडीसीत बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रदिप पवार व श्रीरामपूर शहर पोलिसांना बरोबर घेत मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी साडेचार वाजता श्रीरामपूर एमआयडीसीतील एका कारखान्यावर छापा टाकला. तेथे सुनिल जगदाळे (रा. पनवेल), कार्तिक जेकवाडे (रा. श्रीरामपूर), सचिन नवले ( रा. सुभाषवाडी, बेलापूर) हे तिघे बनावट गुटखा बनविताना आढळले.
पोलीस पथकाने कंपनीची पाहाणी केली असता ग्रायडिंग मशीन, ओव्हन, पॅकेजिंग मशीन, सुपारी, विमल, व्ही-१, कंपनीचे प्लास्टिकचे रोल,पांढऱ्या रंगाच्या पावडरच्या गोण्या, तसेच तयार केलेला विमल पान मसाला व व्ही-१ तंबाखू असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी कारखान्यात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर कंपनीचे मालक गोपी ओझा (रा.वारजे, पुणे), जीवन पवार (रा. डोंबिवली, ठाणे) असल्याचे सांगितले.
त्याचबरोबर एमआयडीसीतील कारखाना प्रफुल्ल ढोकचौळे (रा. रांजणखोल), सुभाष घोरपडे (रा. श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी) यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. कारवाईदरम्यान पोलिसांना कारखान्यापुढे होंडा सिटी कार (क्र. एमएच २ सीव्ही ६५३) आढळून आली. तिच्या डिकीमध्ये तपासणी केली, विमल पान मसाला व व्ही-१ तंबाखूचे बॉक्स भरलेले आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी बनावट गुटखा, सुगंधी तंबाखू बनविण्याचे पदार्थ, साहित्य, मशिनरी, बनावट पॅकिंग पिशव्या, होंडा सिटी कार असा एकूण २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीत काम करणारे तीनजण, कंपनीचे मालक दोघे व जागा मालक दोघे अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल
केला आहे.