अहमदनगर बातम्या

पोलिसांची पाथर्डीत छापेमारी ! आयएएस पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचा शोध सुरू, कलेक्टरही ऍक्शन मोडवर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : विविध कारणामुळे सध्या राज्यभर चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात मोठी अपडेट आली आहे. पुणे पोलिसांनी पाथर्डी आणि मुंबईत छापेमारी केली आहे.

पोलीस आयएएस पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांना मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांना शोधत आहेत. त्या अनुषंगानेच पुणे पोलिसांनी पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील फार्म हाऊसवर छापेमारी केली असल्याची माहिती समजली आहे.

बंदुकीने धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकवल्याबाबत मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता त्यांच्यासाठी पुणे पोलिसांनी पाथर्डीसह मुंबईतील विविध भागात छापेमारी सुरू केली आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारीही ऍक्शनमोड मध्ये
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नेत्रदोष आणि मानसिक आजारपणाचे दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून दिल्याचे सिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याकडे याबाबत सविस्तर अहवाल मागविला आहे.

सोमवारी सायंकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी या प्रकरणातील काही कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांना दाखवली. त्यांच्यासमवेत दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी असलेल्या तत्कालीन वैद्यकीय

मंडळात सहभागी असलेले तीन सदस्यही होते. खेडकर यांना हे प्रमाणपत्र देताना काय तपासणी केली, त्याचे अहवाल व अधिकाऱ्यांचा लेखी अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला आहे.

महाऑनलाइन संकेतस्थळाची मदत घेणार
शेवगाव-पाथर्डी प्रांत अधिकारी कार्यालयात क्रिमिलेयर प्रमाणपत्रांच्या नोंदी जुन्या रजिस्टरमध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्या नोंदी आणि दस्तावेज शोध घेण्यात अडचणी येत आहेत. यासाठी आता महाऑनलाइन संकेतस्थळाची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती प्रांत अधिकारी प्रसाद मते यांनी दिली.

 

Ahmednagarlive24 Office