Ahmednagar News : नगर शहरात महिला पोलिसाला मारहाण, पहा काय घडला प्रकार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar News : पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या काही घटना ताजा असतानाच आता नगर शहरातून महिला कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी महिलेला भररस्त्यात शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केला आहे.

हा संतापजनक प्रकार नगर शहरात कापड बाजारमध्ये घडला आहे. प्रकाश सखाराम घोलप (वय ५२, रा. नांगरे गल्ली, माळीवाडा) असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी प्रकाश सखाराम घोलप गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस नाईक यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या कर्तव्यावर असताना एका आरोपीचा त्या शोध घेत होत्या.

त्यासाठी त्या कापड बाजाराकडे गुरुवारी (दि.१८) सायंकाळी चाललेल्या होत्या. त्यावेळी द्वारकादास लस्सी दुकानासमोर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्या पुढे सरसावल्या व आडवी, तिडवी वाहने घालणाऱ्या वाहनचालकांना त्या वाहने मागे पुढे घेण्याबाबत सूचना देत होत्या.

आरोपी घोलप हाही त्या वाहतूक कोंडीत अडकलेला होता. त्यास वाहन पुढे घेण्यास सांगितले असता त्याचा राग येवून त्याने फिर्यादीला शिवीगाळ सुरु केली. त्यावेळी फिर्यादी हा ‘मी पोलिस नाईक आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे माझे कर्तव्य आहे, तुम्ही शिवीगाळ करून वाद न घालता तुमचे वाहन बाजूला घ्या’,

असे समजावून सांगत असताना आरोपी घोलप याने फिर्यादीचा हात पकडून शिवीगाळ करत चापटीने त्यांना मारहाण करू लागला. तसेच फिर्यादीची गळ्यातील ओढणी ओढत त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत त्यांचा विनयभंग केला.

याशिवाय त्या कर्तव्य बजावत असताना त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश घोलप याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५३. ३५४, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यावर पो.नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि. योगिता कोकाटे व पोलिस पथकाने आरोपी घोलप यास रात्री अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe