अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : पोल्ट्री व्यवसायाला उष्णतेचा फटका, हिटस्ट्रोकने ब्रॉयलर कोंबड्यांना मोठी मर

Published by
Ajay Patil

Ahmednagar News : यंदा उष्णतेने अगदी उच्चांक गाठला आहे. दिल्लीत तर ५२ अंशावर तापमान गेले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील तापमान जवळपास ४२ अंश सेल्सियस पर्यंत गेलेले पाहायला मिळाले.

परंतु या तापमानवाढीचा फटका अहमदनगर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना जसा बसला तसाच फटका पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ‘हिटस्ट्रोक’ने ब्रॉयलर कोंबड्या व पिलांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात तरुण या व्यवसायाकडे वळले आहेत.

दुष्काळपीडित भागात देखील मोठ्या संख्येने शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून व मोठा खर्च करून पोल्ट्री फार्मची उभारणी केलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यात तळेगाव, चिंचोलीगुरव, देवकौठे, नान्नजदुमाला, कौठेकमळेश्वर, तिगाव, वडझरी, भागवतवाडी, काकडवाडी, सोनेवाडी, केडगाव, कांबरगाव, सारोळा सहित अनेक गावांमध्ये शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळलेले आहेत.

ब्रॉयलर आणि लेयर पोल्ट्री पद्धतीने शेतकरी व्यवसाय करतात. पोल्ट्री फार्मधारक टँकरने पाणी आणून ब्रॉयलर व लेयर कोंबड्या जगवीत आहेत. पोल्ट्री फार्ममध्ये छोट्या पिल्लांची बॅच टाकल्यापासून ते मोठी होईपर्यंत काळजी घ्यावी लागते.

त्यासाठी शेतकऱ्यांनी या व्यवसायातील विविध कंपन्यांशी करार केलेले आहेत. पोल्ट्री व्यवसाय करताना खाद्य, पाणी, औषधे, वीज यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्याशिवाय विविध नैसर्गिक संकटांचा देखील सामना करावा लागतो. काही वर्षांपूर्वी बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडे मोडले होते.

उन्हाळ्यात तापमान, पावसाळ्यात वादळवारे आणि हिवाळ्यात थंडीचा कडाका याचा फटका या व्यवसायाला बसतो. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले आहे. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळ्याच्या तडाख्याने ‘हिटस्ट्रोक’ प्रमाण वाढल्याने ब्रॉयलर कोंबड्या आणि पिलांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपले पोल्ट्री बंद केले असल्याचे चित्र आहे.

उन्हाळ्यातील तापमान वाढ, उष्णतेच्या झळ्या व पिण्यास पुरेसे पाणी न मिळाल्यास बॉयलर व लेयर कोंबड्या, पिलांचे मृत्यू प्रमाण वाढू शकते. यंदा तापमान वाढल्यामुळे पोल्ट्रीतील बॉयलर व लेयर कोंबड्यांचे मृत्यू प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे अशी प्रतिक्रिया काही पशुवैद्यकीय अधिकारी देतात.

Ajay Patil