Ahmednagar News : जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली असली तरी जिल्ह्यातील उत्तरेत असलेल्या धरणांच्या पाणलोटात अद्याप समाधानकारक पाऊस सुरु झालेला नाही. मुळा भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही.
मुळा खोऱ्यात अधूनमधून रोहिणी नक्षत्रापासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, अद्यापही या परिसराला साजेसा पाऊस सुरू झालेला नव्हता. मात्र सोमवारी अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे भंडारदरा धरणामध्ये काही प्रमाणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाने मृग नक्षत्रतातच जोरदार हजेरी लावली. उत्तरेच्या तुलनेत यंदा दक्षिणेत चांगला पाऊस सुरवातीच्या टप्यात झालेला आहे. दरम्यान हरिश्चंद्रगडाच्या पर्वत रांगांत मान्सून सक्रिय होऊ लागला आहे.
मुळा खोऱ्यातील आंबित येथील लघु पाटबंधारे तलाव शुक्रवारी सकाळी सात वाजता पूर्ण क्षमतेने भरला. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास रतनवाडी, साम्रद, घाटघर या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला.
प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे डोंगरावरून बऱ्याच ठिकाणी धबधब्यांची मालिका सुरु झाल्याचे दिसत आहे. तर रविवारी देखील भागाला मुसळधार पावसाने झोडपले होते.
सोमवारी देखील तीन वाजेपासून कोलटेंबे, रतनवाडी, साम्रद, घाटघर, उडदावणे, पांजरे या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या गावांना जोरदार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे आदिवासी बांधवांचे भातशेती तुडुंब भरली आहे. तर रतनवाडीत काही ठिकाणी बांधफुटीचा प्रकार घडला आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रोज पाऊस पडत असला, तरी धरणावर मात्र पावसाची प्रतिक्षा आहे. मागील आठवड्यात घाटघर या गावात तीन तास जोरदार मुसळधार पाऊस पडला होता.दररोज होत असल्याने या पावसामुळे मात्र भंडारदरा धरणामध्ये काही प्रमाणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
घाटघर, रतनवाडी, पांजरे, या भागातील पाऊस मोजला जातो. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात किती पाऊस पडला याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान भंडारदरा धरणामध्ये सध्या अकरा टक्के पाणी शिल्लक असून धरणामध्ये १२२९ दशलक्ष पाणीसाठा झाला आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणलोटात आता पावसाचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे.