अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : मान्सूनचा दिलासा मात्र मजुरीच्या वाढत्या दराने शेतकरी हवालदिल !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात परत शेतीसाठी आवश्यक असलेले खाते बी-बियाणे यांचे वाढत असलेले भाव यामुळे खर्च वाढला आहे. मात्र त्या तुलनेत शेतमालाला मिळत असलेले भाव यात खूप मोठी तफावत येत आहे. पर्यायाने उत्पादन खर्च वजा शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडत नाही. या अडचणींवर कसाबसा मात करत शेतकरी शेती करत होता. परंतु आता वाढत असलेल्या मजुरीच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

सध्या शेती करणे म्हणजेच जुगार खेळणे होऊन बसले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, हा शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलाय. तरीसुद्धा प्रत्येक हंगामात शेतकरी नव्या उमेदीने प्रत्येक संकटाला तोंड देऊन शेती करीत असतो. सध्या शेतकरी वर्ग खरीपाची तयारी करीत असून, वाढलेले मजुरीचे दर, मजुरांची कमतरता, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
खरीप हंगाम तोंडावर असताना मजुरांना जास्त मजुरी देऊनसुद्धा मजुर मिळेनासे झाल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कुटुंब शेतात राबताना दिसत आहे तसेच वेळेवर मजुर उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे करण्यात अडचणी येत असल्याने बाहेर गावाहून मजूर आणून शेतीची कामे करावी लागत आहेत. परंतु बाहेरील शेतमजुर आणताना जास्त पैसे मोजावे लागत असल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ते परवडणारे नाही. बाहेरगावी जाऊन शेतमजुर आणायचे म्हणजे चार चाकी वाहन किंवा रिक्षा भाड्याने करावी लागते.

त्यात जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे काय करावे व काय करू नये, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शेतात काम करण्यासाठी कुणी तयार नसल्याने शेती कशी करावी, ही गंभीर समस्या शेतकऱ्यांसमोर उभी आहे. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड तर बसतोच शिवाय शेतीची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत, परिणामी शेतकरी चिंतेत आहे. वाढीव मजुरी देऊनसुद्धा त्याला मजुर मिळणासा झालाय. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकरी मात्र मजुरीच्या वाढत्या दराने हवालदिल झालेला दिसून येत आहे.

Ahmednagarlive24 Office