Ahmednagar News : मुळा धरणातून आजपासून (५ एप्रिल) शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन हे साधारण ४५ दिवसांचे असते. परंतु धरणातून नोव्हेंबर २०२३ मध्ये १.९६ टिएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात आले असल्याने ४५ ऐवजी ३० दिवसांचेच आवर्तन असणार आहे.
कालावधी कमी झाल्याने शेतकऱ्यांना १५ दिवस कमी कालावधीत आवर्तन मिळणार आहे. पुढील खबरदारी व गैरप्रकार टाळण्यासाठी महावितरणला शटडाउन घेण्याचे जलसंपदा विभागाने निर्देश दिलेत. तसेच लाभक्षेत्रात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
मुळा धरणातर्गत सुमारे ६९ हजार ५३४ हेक्टर सिंचन क्षेत्र असले तरी मागणी ३० हजार हेक्टरसाठी आलेली आहे. त्यानुसार मुळा जलसंपदा विभागाने सिंचनासाठी शुक्रवारी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मे महिन्यात आणखी एका आवर्तनाची आवश्यकता असली तरी ते आवर्तनही देता येणार नाही.
या आवर्तनाद्वारे ३ हजार ५८१ दलघफू पाणी सोडण्याचे नियोजन आहे. सिंचनासाठीचे आवर्तन सुरू झाल्यानंतर पाणी चोरीचे प्रकार होऊ नयेत, तसेच मारहाण होऊ नये, यासाठी १४४ कलम नगर उपविभागीय अधिकाऱ्यांनी मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात लागू करण्यात आले आहे.
पाटचाऱ्यांच्या पडझडीमुळे पाणी नासाडीची शक्यता
मुळा धरणाचे आवर्तन सोडण्यात येत असले, तरी कालव्याखालील क्षेत्रात कालवे, पाटचाऱ्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. कालव्यातील दगडी बांधकाम अस्तरीकरण निघून गेल्याने कालवा फुटण्याचा धोका वाढला आहे. तसेच पाटचऱ्यांत झाडा झुडुपांचा विळखा असल्याने चाऱ्यांचा श्वास कोंडला आहे. शेतात पाटपाणी पोहोचेपर्यंत पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता असलयाचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दुष्काळाची छाया
अहमदनगर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया निर्माण झाली आहे. अनेकभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जलसंपदाने अहमदनगर महापालिकेसह अनेक ठिकाणी २० टक्के पाणी कपातीचे आदेशही दिले आहेत.