Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात फ्रीस्टाईल हाणामाऱ्या झाल्याचे वृत्त आले आहे. जुन्या वादातून भांडणे झाली व वाद वाढत जाऊन फ्रीस्टाईल हाणामाऱ्या झाल्या. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे ही घटना घडली.
हाणामाऱ्या सुरु झाल्याने काही काळ गावातील मुख्य चौकात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यात तिघे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजली आहे. निपाणीवाडगाव शिवारातील मुलगी भोकर येथे दिलेली आहे. गेल्या दोन तीन वर्षापूर्वी झालेल्या विवाहा दरम्यान किरकोळ वाद झाले होते, त्या वादाचे रूपांतर काल येथे झाले.

निपाणी वाडगाव येथील महंमद राजू पठाण हे भोकर येथे आपल्या गाडीला साऊंड सिस्टीम बसविण्याकरीता आला होता. गाडीचे कामही पूर्ण झाले होते. परंतु किरकोळ दुरूस्तीची शंका आल्याने पठाण पुन्हा भोकर येथील अॅडीओचे दुकानात आले, याच दरम्यान समोरच्याला जुन्या वादाची आठवण झाली व त्यातून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास अशोकनगर फाटा व निपाणीवाडगाव येथून काही तरूणांचा समूह भोकर गावात हातात दांडे घेऊन वाहनाने दाखल झाला अन् थेट हाणामाऱ्यांना सुरूवात झाली. फ्रीस्टाईलने अचानक बाहेरून आलेल्यांनी गावातील काहींना मारहाण करण्यास सुरूवात केल्याचे लक्षात येताच येथील एकजण मध्यस्थितीसाठी गेला अन् त्यालाही चांगलाच फटका बसला अन् पुन्हा वादाचा भडका उडाला, येथे भरदुपारी गावातील भवानी चौकात दोन गटांत लाकडी दांडके,
लाकडी दांडे व नंतर जे हातात येईल त्याने मारहाण सुरू झाली. या मुका मार देण्यावर भर होता, काहींनी येथील दुकांनासमोर लावलेले बोर्ड उचलून हाणामाऱ्यांसाठी वापरल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले, या प्रकाराने काही काळ भोकर गावात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक अनोळखी इसम गावात येऊन दांडक्याने फ्रिस्टाईल मारहाण करण्याचा प्रकार ग्रामस्थांसाठी नवीन होता.
त्यामुळे परिसरातील अनेक व्यावसायिकांनी आपले शटर खाली घेत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलीस पाटील बाबासाहेब साळवे यांचे लक्षात येताच त्यांनी लागलीच तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पण काल गटारी अमावास्या व मद्यपींचा उत्सवाचा दिवस असल्याने बंदोबस्तात व्यस्त असलेली पोलीस यंत्रणा वेळेत येवू शकले नाही.
दांडे घेऊन आलेल्या गटातील काहींना चांगलाच मार बसल्याने ते जखमी झाल्याचे लक्षात आल्याने निपाणीवाडगाव येथून आलेल्या गटाने पळ काढत थेट तालुका पोलीस ठाणे गाठत तेथे कैफीयत मांडत येथील वसीम शेख, गुड्डू शेख व लाला शेख यांचे विरूद्ध भा.न्या.सं.का कलम ११५ (२), ३५२, ३५१ (२), (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी निपाणी वाडगाव येथील महमद पठाण यांनी आमचा जुना वाद आहे. आम्ही भोकर येथे गाडीला साऊंड सिस्टीम बसविण्यासाठी गेलो असता तेथे जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीचा मित्र शुभम सर्जेराव मुंजाळ, इसाक चाँद पठाण यांना देखील मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची
धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, प्रत्यक्षात निपाणी वाडगाव येथील आणखी दोघे जखमी झाले तर भोकर येथील ही दोघे किरकोळ जखमी झाले असल्याची चर्चा रात्री उशीरापर्यंत सुरू होती. यातील एका गटाने तालुका पोलीस ठाण्यात भोकर येथील तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला तर दुसरा गट मात्र रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात दाखल नव्हता.