Ahmednagar News : फासे पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोण आजही बदलला नाही. त्यामुळे हा समाज अद्यापही विकासापासून दूर आहे.परंतु मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या पुढाकाराने भटकंती करणाऱ्या फासे पारधी समाजाच्या ऋतिका दस्ताफुल भोसले हि मुलगी पोलीस होऊन आपले स्वप्न साकार करणार आहे.
नेवासा तालुक्यातील लोहोगाव येथील भटकंती करणाऱ्या फासे पारधी समाजाच्या ऋतिका दस्ताफुल भोसले या मुलीने ७ किलोमीटर रोज सोनई येथे सायकलवर जाऊन श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून बारावीच्या परीक्षेत ७६.१७ गुण मिळवत विशेष प्रविण्य मिळवले.
घरची परिस्थिती हलाखीच्या असलेल्या व शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या फासे पारधी समाजातील ऋतिकाची पोलीस होण्याची मनिषा आहे; परंतु घरची असलेली बेताची परिस्थिती व अडचणी यामुळे ऋतिकाचे पुढील उच्च शिक्षण घेऊन पोलीस बनण्याचे स्वप्नच परिस्थिती अभावी अशक्यप्राय झाले होते.
ऋतिका भोसलेचा शिक्षणासाठी असलेल्या संघर्षाची माहिती मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ऋतिका भोसले तिचे वडील दस्ताफुल भोसले यांना बोलावून घेत त्यांच्याशी याबाबत चर्चा केली.
मुलीने मोठ्या जिद्दीने शिक्षण घेतले आहे, तिचे शिक्षण परिस्थितीअभावी थांबवू नका. तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च राहण्यासाठी वसतिगृह व्यवस्था, भोजन व्यवस्था व पोलीस भरती परीक्षेची व मैदानी चाचणीची तयारी करण्यासाठी स्टडी क्लब सुविधा इत्यादी सुविधा मुळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मोफत देण्यात येणार असल्याचे उदयन गडाख यांनी सांगितले व मुलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे पालकत्व स्वीकारले.
ध्येयाने प्रेरित होऊन मोठ्या कष्टाने शिक्षण घेणाऱ्या फासे पारधी कुटूंबातील मुलीचे शिक्षण थांबू नये, तिच्या पोलीस होण्याच्या स्वप्नांना बळ मिळावे, या हेतूने पालकत्व स्वीकारल्याचे उदयन गडाख यांनी सांगितले. गडाख यांनी ऋतिका हिचे पालकत्व स्वीकारले असल्याने आता तिचे पोलीस होण्याचे स्वप्न निश्चित साकार होईल.