अहमदनगर बातम्या

अहमदनगरमध्ये नद्यांना पूर, भंडारदरासह सहा धरणात भरपूर पाणी, पहा पाणीसाठा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या घाटघर येथे रविवारी (दि. ४) विक्रमी १९ इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान भंडारदरा धरण ओव्हर-फ्लो असून, त्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची झपाट्याने आवक वाढत आहे. त्यामुळे धरणातून २७ हजार ११४ क्यूसेकने पाणी सोडले आहे. प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे.

गेल्या काही दिवसांत कुकडी प्रकल्पातील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे डिंभे, घोड, येडगाव, वडज, चिलेवाडी ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

रविवारी दुपारपासून घोड धरणातून नदीपात्रात दहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरू झाले आहे. डिंभे धरणातून ५ हजार, येडगावमधून ५ हजार, वडजमधून ३ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

घोड धरण ओव्हरफ्लो
घोड धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील घोड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

माणिकडोह ४३ टक्के
कुकडी नदीवरील माणिकडोह धरणात ४ हजार ३०९ एमसीएफटी इतका पाणीसाठा (४३ टक्के) झाला आहे.

पिंपळगाव जोगे १० टक्के, तर विसापूर ५० टक्के
पिंपळगाव जोगे धरणात ६८२ एमसीएफटी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. विसापूर तलाव ५० टक्के इतका भरला आहे. विसापूर, सीना तलावात येडगाव धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे

मुळा धरण 75 टक्के
दक्षिण अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरण पाणलोट क्षेत्रात ढगफुटी सदृश पर्जन्यवृष्टी सुरू आहे. रविवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत पाणीसाठ्यात १ हजार ३८७ दशलक्ष घनफूट वाढ झाली.

या हंगामातील ही चोवीस तासातील सर्वाधिक वाढ आहे. रविवारी सायंकाळी धरण ७५ टक्के भरले. धरणाकडे कोतुळ येथून ३० हजार १२५ क्युसेक आवक सुरू आहे.

धरणात १९ हजार ७३५ दशलक्ष घनफूट (७५ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.

भंडारदरा भरले
भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

Ahmednagarlive24 Office