Ahmednagar News : १ ऑगस्टपासून सर्व दूध संकलन केंद्रांनी शेतकऱ्यांना ३० रुपये प्रतिलिटर भाव द्यावा, अन्यथा केंद्रांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशाराही विखे यांनी दिला.
दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. या समितीला गुणवत्ता तपासण्याचे अधिकार आहेत. दूध भेसळ होत असेल तर गुन्हे दाखल करू. आतापर्यंत जिल्ह्यात दूध उत्पादकांना ९६ कोटींचे अनुदान वाटप केले आहे, असेही विखे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शासन निर्णयाप्रमाणे दूध दर तसेच दुधभुकटी अनुदान योजना तसेच जिल्हास्तरीय दुध भेसळ समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,
शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक दूध संकलन केंद्रावर उच्चप्रतीच्या दुधाचे संकलन करण्यात यावे.
दुधाच्या गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत जिल्ह्याचा उत्तर व दक्षिण विभागामध्ये दुधाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी पथक गठित करण्यात येऊन त्यांच्यामार्फत दुधाची तपासणी करण्यात यावी.
तपासणीमध्ये दुधामध्ये भेसळ आढळुन आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच दुधसंकलन केंद्रावर दुध देणाऱ्या शेतकऱ्यांना 30 रुपये प्रतीलिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जे केंद्र शेतकऱ्यांना 30 रुपयांचा दर देणार नाहीत,
त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश देत प्रत्येक दुध संकलन केंद्रावर संकलित होणाऱ्या दुधाची माहिती मिळावी यासाठी विशेष अॅप तयार करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले. बैठकीस जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संघ व खाजगी दुध प्रकल्पाचे
प्रतिनिधी उपस्थित होते.