Ahmednagar News : बसमध्ये प्रवासी.. बस भरधाव वेगात निघालेली.. अचानक बसची मागील दोन चाके बाहेर आली.. त्यानंतर… हा थरार घडलाय अहमदनगर जिल्ह्यात.
त्याच झालं असं की, शेवगाव आगाराच्या अहमदनगरहून मिरीमार्ग शेवगावकडे येणाऱ्या एसटी बसची पाठीमागील दोन चाके अचानक बाहेर आले. रस्त्यावरील नागरिकांच्या व इतर प्रवाशांच्या ही बाब तात्काळ लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला.
चालकाच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून बस थांबवली. त्यामुळे बसमधील प्रवाशी बालंबाल बचावले. या घटनेमुळे एका मोठ्या अपघातातून प्रवाशांची सुटका झाली.
शेवगाव आगाराची अहमदनगरहून मिरीमार्गे शेवगावकडे येणारी बस शनिवार (दि.२४) रोजी दुपारी ४ च्या सुमारास निंबेनांदुर येथे आली. तेथील प्रवाशी उतरवल्यानंतर ही बस भरधाव ढोरजळगावकडे येत असताना चालकाच्या बाजूची मागील दोन्ही चाके अचानक बाहेर आली.
ही बाब रस्त्यावरील इतर वाहन चालक व नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड करुन ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान साधून बस एका बाजूला उभी केली. त्यामुळे आतील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
मात्र, पाऊस सुरु असल्याने दुसऱ्या गाडीची व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. रात्री उशिरापर्यंत आगारातील कर्मचारी बसच्या दुरुस्तीचे काम करत होते.
शेवगाव आगाराच्या सर्व बसेसची अत्यंत दुरावस्था झाली असून, वेगवेगळ्या कारणाने बसमध्ये बिघाड होण्याचे प्रकार सातत्याने सुरु असतात. त्याचा मनस्ताप व चालक वाहकांबरोबर प्रवाशांना सहन करावा लागतो.