Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील ४० वर्षीय सुभद्रा राजेंद्र मुंढेकर (रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदे) यांचा मृतदेह कोरेगाव (जि. सातारा) येथे आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
राजेंद्र जगन्नाथ देशमुख (रा. मुंढेकरवाडी) व बिभीषण सुरेश चव्हाण (रा. बाभूळगाव, ता. इंदापूर) असे त्यांची नावे आहेत. दरम्यान त्यांनी हा खून का केला हे समोर आले आहे. प्रेमसंबंध व शेतीच्या वादातून या दोघांनी सुभद्रा मुंढेकर यांचा गळा आवळून खून करून कालव्यात मृतदेह फेकून दिल्याचे निष्पन्न झाले.
सुभद्रा मुंढेकर या काही दिवसांपूर्वी घरात काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर श्रीगोंदे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी राजेंद्र देशमुख व बिभीषण चव्हाण यांना ताब्यात घेतले.
चौकशीत राजेंद्र देशमुख याने गुन्ह्याची कबुली दिली. मागील ५ महिन्यांपासून सुभद्रा मुंढेकर हिच्यासोबत असलेले प्रेमसंबंध, तसेच त्यांच्या भावासोबत असलेले शेतजमिनीचे वादातून दोन्ही आरोपींनी गळा आवळून खून केला.
तिचा मृतदेह कालव्यातील पाण्यात टाकुन दिला, अशी कबुली दिली. ही घटना कोरेगाव (जि. सातारा) हद्दीत घडलेली असल्याने श्रीगोंदे पोलिसांनी दोन्ही आरोपींना कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. कोरेगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदे पोलिस या गुन्ह्याच्या तपास करीत असतानाच कोरेगाव (सातारा) येथील कालव्यात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती श्रीगोंदे पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील अंगठी नातेवाईकांना दाखवण्यात आली. या वस्तू सुभद्रा मुंढेकर यांच्याच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
कानातील दागिन्याच्या हॉलमार्क वरून महिलेची ओळख
कोरेगाव तालुक्यात एका कॅनॉलमध्ये हात बांधलेला व सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी कौशल्याने तपास करत कानातील दागिन्याच्या हॉलमार्क वरून महिलेची ओळख पटवली. महिला मुंढेकरवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील असल्याचे समोर आले.