अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : २०१८-१९ सारखी टंचाई ! भंडारदरात अवघा १६ तर निळवंडेत १४ टक्के जलसाठा, पाणी टंचाईचे संकट गडद

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पाणीटंचाई भीषण होत चालली आहे. वरुणराजाचे आगमन वेळेत झाले तर निदान पाण्याची समस्या सुटेल अन्यथा पाणी समस्या बिकट होण्याची स्थिती आहे. उत्तरेस वरदान ठरणाऱ्या भंडारदरा धरणात आजमितीस अवघा १६ तर निळवंडेत १४ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.

अकोले तालुक्यातील ४ गावे २९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसागणिक पाणीटंचाईचे भीषण दुर्भिक्ष गडद होत असून, तालुक्यातील जलसाठ्यांनी तळ गाठला आहे. निळवंडेत ११८२ दशलक्ष घनफूट इतके तर भंडारदरा जलाशयात १७७४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

तालुक्यातील प्रथम पाणीटंचाईची झळ सोसणारे मुधाळणे व मन्याळे ही दोन गावे मन्याळेच्या गवारवाडी, पिरसाईवाडी, माळवाडी, विलासनगर, पिसेवाडी, कळंब गावची परतनदरा गारवाडी, हांडेवाडी, डोंगरवाडी मासेरेवस्ती, देवठाण धरणाच्या पाणलोटात उघडेवस्ती, पथवेवस्ती, गिन्हेवाडी, मेनखिंड, खडकेवाडी, गांगडवाडी, मुथाळणेची पागीरवाडी, ठाकरवाडी, कानडवाडी, नायकरवाडी या २० वाड्यांची तहान टँकरने भागवली जात होती.

अकोले हा डोंगराळ भाग असल्याने सरकारी टँकरनेच पाणीपुरवठा केला जातो. भंडारदरा धरणाच्या वॉलमधून १०३१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर निवंडेतून कालव्यांमध्ये १५० क्युसेक व प्रवरा नदीपात्रातून १५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

आढळा प्रकल्पात ४२५ दशलक्ष घनफूट पाणी असून, उजव्या डाव्या कालव्यांतून ७० क्युसेकने आवर्तन सुरू आहे. पिंपळगाव खांड ९६, अंबित – ४८, बलठण – १९, कोथळे – ४८, देवहंडी शिरपुंजे २०, बदगी बेलापूर १४, बोरी ११, घोटी शिळवंडी ३९, वाकी ५१, टिटवी ५२, सांगवी १४, पाडोशी २१ अशा छोट्या-मोठ्या लघुपाटबंधारे तलाव प्रकल्पांमध्ये एकूण ४३३ दशलक्ष घनफूट पाणी आहे.

२०१८ – १९ सारखी पाणीटंचाईची तालुक्यातील परिस्थिती आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात कोणताही हलगर्जीपणा नाही असे टंचाई विभागच्या एका अधिकाऱ्याने मीडियाशी बोलताना सांगितले.

Ahmednagarlive24 Office