Ahmednagar News : 4 ऑक्टोबर पासून वाजणार शाळेची घंटा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :-  कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गत दिड वर्षांपासून ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा बंद आहेत . पण शासनाच्या ‘ शाळा बंद शिक्षण चालू ‘ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शालेय शिक्षण चालू आहे.

मात्र या ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळल्याने , पालक शाळा कधी सुरु होईल ? या चिंतेत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली असून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबर पासून सुरु करण्यास शासनाने परवाणगी दिली आहे. सरकारच्या आदेशानुसार शाळा सुरु करण्यास सज्ज झाल्या आहेत.

शाळेत न जाता घरी बसलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना या निर्णयाने आनंद झाला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातला हरवलेला प्रत्यक्ष संवाद आता सुरु होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता काहिसा कमी झाला असून लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

त्यामुळे राज्य सरकारने काही मार्गदर्शक तत्वांनुसार शाळा सुरू करण्यास अनुमती दिली आहे. वर्गात ५० टक्के उपस्थीती, वर्गात किमान १५ विद्यार्थी, विद्यार्थ्यां मध्ये किमान सहा फुटाचे अंतर, प्रत्येक वर्ग सॅनिटाइज , विद्यार्थ्यांची हजेरी नाही,

शाळेत येण्यास सक्ती नसणार, मास्क परिधान करणे आवश्यक , पालकांची संमत्ती आवश्यक या नियमावलीचे पालन करून शाळा सुरु करण्यास परवाणगी दिली असली तरी ग्रामीण स्तरावर पालक आणि ग्रामपंचायतीच्या संमतीनेच पाचवीपासूनचे वर्ग सुरु करावे लागणार आहेत. ग्रामपंचायतीने ठराव केल्यानंतरच शाळा सुरु होतील .

विद्यार्थ्यांसमवेत पालकांचीही कोरोना नियम पालन करण्याची जबाबदारी असेल . विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शाळा सुरु करण्यासाठी सर्व वर्गांच्या स्वच्छते बरोबरच वर्ग सॅनिटाइज करुन घेतले जात आहेत.

पालकांनी संमती दिलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे शाळा सुरु होण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांची आपल्या शालेय सवंगड्याशी भेट होणार असून वर्ग सुरु झाल्यानंतर शालेय परिसर पुन्हा एकदा पहिल्या सारखा गजबजणार आहे.